अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार म्हणाले, आम्हावरी खिळले डोळे, उद्याच्या पिढ्यांचे, आज स्वप्न बघतो आम्ही, उद्याच्या दिवसांचे

अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार म्हणाले, आम्हावरी खिळले डोळे, उद्याच्या पिढ्यांचे, आज स्वप्न बघतो आम्ही, उद्याच्या दिवसांचे

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अर्थमंत्री अजित पवारांनी विक्रमी अकराव्या वेळेला अर्थसंकल्प सदा केला आहे. आम्हावरी खिळले डोळे, उद्याच्या पिढ्यांचे, आज स्वप्न बघतो आम्ही, उद्याच्या दिवसांचे… असे म्हणत आपला अर्थसंकप भविष्यवेधी असल्याचे त्यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले, हे वर्ष अनेक दृष्टीने विशेष आहे. स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई यांचे हे त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीवर्ष आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे. देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या आपल्या संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा या विशेष वर्षात आज आमलकी एकादशीच्या पवित्र दिवशी मला माझा अकरावा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळते आहे, हे मी माझे भाग्य समजतो.नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला बहुमताचा अभूतपूर्व कौल दिला. राज्यातील तमाम जनतेचे मी त्‍यासाठी आभार मानतो. मतदारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास जबाबदारीची जाणीव करून देणारा असून त्याचा सन्मान राखण्याचे काम महायुतीच्या सरकारकडून निश्चितपणे होईल, याची ग्वाही मी देतो.
1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केंद्र शासनाने आयकरात मोठी सूट देऊन मध्यमवर्गीयांना दिलासा दिला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे राज्याच्या अनेक महत्वाकांक्षी योजनांना नक्कीच बळ मिळणार आहे. राज्यातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्प, रेल्वे आणि कल्याणकारी योजनांकरिता केंद्र शासनाने केलेल्या भरीव तरतूदींकरिता मी राज्यातील जनतेच्यावतीने भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय . नरेंद्र मोदी महोदयांचे मन:पूर्वक आभार मानतो. यापुढील कालावधीतही असेच भरभक्कम पाठबळ केंद्र शासनाचे राज्याला लाभेल, याची खात्री मी बाळगतो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सन २०४७ पर्यंत भारत हे विकसित राष्ट्र व्हावे, असा माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी महोदयांचा संकल्प आहे. हा संकल्प सिध्दीस नेण्यासाठी महाराष्ट्र अव्वल दर्जाची कामगिरी करेल, यात मला तीळमात्र शंका नाही. या सरकारच्या स्थापनेच्या वेळी “महाराष्ट्र आता थांबणार नाही” असा संकल्प मुख्यमंत्री महोदयांनी केला आहे. “विकसित भारत-विकसित महाराष्ट्र” हे सूत्र प्रत्यक्षात आणण्याकरीता विकासचक्राला गती देणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन, राज्याच्या शाश्वत व सर्वसमावेशक विकासाची रुपरेषा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. उद्योग, पायाभूत सुविधा, कृषि व संलग्न क्षेत्रे, सामाजिक व इतर क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाच्या तरतुदी करणारा हा अर्थसंकल्प आहेमी असे सांगताना अजित पवार म्हणाले,

महाराष्ट्र आता थांबणार नाही

विकास आता लांबणार नाही

अजित पवार यांचे अर्थसंकल्पीय भाषण पुढीप्रमाणे :

सुविकसित पायाभूत सुविधा, मुबलक नैसर्गिक संसाधने आणि कुशल मनुष्यबळामुळे महाराष्ट्र हे नवीन उद्योग स्थापित करण्यासाठी आदर्श राज्य आहे. उद्योग क्षेत्रातील देशांतर्गत व परदेशी थेट गुंतवणुकीसाठी शासन सतत प्रयत्नशील असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. अर्थव्यवस्थेच्या विकासचक्राला चालना देण्यासाठी खाजगी तसेच शासकीय गुंतवणूक, नागरिकांचा उपभोग खर्च आणि निर्यात या चार प्रमुख घटकांमध्ये वृध्दी होणे आवश्यक आहे.

शासनाने पायाभूत सुविधांवर केलेल्या गुंतवणुकीमुळे तसेच उद्योगांना दिलेल्या विविध प्रोत्साहनांमुळे मोठ्या प्रमाणावर थेट देशी व परदेशी गुंतवणूक आकर्षित होत आहे. खाजगी गुंतवणुकीमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे, रोजगारात वाढ होऊन उत्पन्नात वृध्दी होते आहे. याव्यत‍िरिक्त शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत असल्याने क्रयशक्ती वाढली आहे. त्याचा परिणाम बाजारात वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ होण्यात झाला आहे. परिणामी गुंतवणूक-रोजगार निर्मिती- वाढीव उत्पन्‍न- मागणी-गुंतवणूक असे विकासचक्र फिरते राहणार आहे. गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती:

औद्योगिक विकासात राज्य सदैव अग्रेसर असून थेट विदेशी गुंतवणूकीच्या बाबतीतही देशात अव्वल आहे. जानेवारी, 2025 मध्ये दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्य शासनाव्दारे एकूण 63 कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. त्‍याव्दारे येत्या काळात 15 लाख 72 हजार 654 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यातून सुमारे 16 लाख रोजगार निर्मिती होईल, असा अंदाज आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मंत्रालयीन विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसांचा सात कलमी कृती आराखडा तयार करण्यात आला. या कृती आराखड्यात संकेतस्थळांचा विकास, सुलभ जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोयीसुविधा, गुंतवणुकीचा प्रसार, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आदींचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमामुळे प्रशासन कार्यक्षम, पारदर्शक, गतिशील, लोकाभिमुख होऊन राज्य प्रगतीच्या शिखरावर जाईल, याची खात्री आम्हाला आहे.

या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन त्रयस्थ संस्थांकडून करवून घेऊन उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यालयांचा गौरव करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम निरंतर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्या धोरणाच्या ५ वर्षाच्या कालावधीत ४० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व ५० लाख रोजगार निर्मितीचे उद्दीष्ट असेल. नवीन औद्योगिक धोरणाबरोबरच अवकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण, इलेक्ट्रॉनिक्स धोरण, जेम्स ॲन्ड ज्वेलरी धोरण, सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम धोरण, चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी स्वतंत्र क्षेत्रीय धोरण जाहीर करण्यात येणार आहेत.

केंद्र शासनाच्या नवीन कामगार संहितेनुसार नवीन कामगार नियम तयार करण्यात येणार आहेत. निर्यातीमध्ये भरीव वाढ होण्याकरीता राज्याने “महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण-2023” जाहीर केले असून राज्यात 37 विशेष आर्थिक क्षेत्रे, 8 कृषि निर्यात क्षेत्रे, निर्यातकेंद्रित 27 औद्योगिक पार्क उभारण्यात आले आहेत. त्यामुळे, देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचे योगदान 15.4 टक्‍के झाले आहे. याशिवाय “एक जिल्हा-एक उत्पादन”, जिल्ह्यांना निर्यातकेंद्र म्हणून विकसित करणे, राज्य-जिल्हा निर्यात प्रोत्साहन परिषद असे काही महत्वाचे उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहेत. सन 2023-24 मध्ये एकूण 5 लाख 56 हजार 379 कोटी रुपयांची व सन 2024-25 मध्ये नोव्हेबर, 2024 पर्यंत 3 लाख 58 हजार 439 कोटी रुपयांची उत्पादने निर्यात करण्यात आली आहेत. राज्याचे “लॉजिस्टिक धोरण-2024” जाहीर करण्यात आले असून त्याद्वारे 10 हजार एकराहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. प्रकल्पांना देऊ केलेल्या विशेष प्रोत्साहन व सुविधांमुळे सुमारे 5 लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र, म्हणजेच “ग्रोथ हब” म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला-वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर व विरार – बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण केली जाणार आहेत. त्यामुळे, मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था सध्याच्या १४० बिलीयन डॉलरवरून सन 2030 पर्यंत ३०० बिलीयन डॉलर, तर सन 2047 पर्यंत 1.5 ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दीष्ट आहे. एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता “स्टील हब” म्हणून उदयास येत आहे. दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गडचिरोली जिल्ह्याकरिता 21 हजार 830 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यातून 7 हजार 500 रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळणासाठी खनिकर्म महामार्गांचे जाळे विकसित केले जात असून त्याकरिता पहिल्या टप्प्यात सुमारे 500 कोटी रुपये किंमतीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. समतोल प्रादेशिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक प्रोत्साहन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये 6 हजार 400 कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान प्रस्तावित आहे. महावितरण कंपनीने येत्या 5 वर्षांसाठी वीजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे. ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये १ लाख १३ हजार कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज आहे. यामुळे, राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील. बेंगलुरु-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडॉरसाठी भूसंपादनाची कार्यवाही सुरू असून या प्रकल्पामुळे राज्यातील अवर्षणप्रवण भागात उद्योगांची स्थापना होऊन रोजगार निर्मितीला चालना मिळेल. राज्याला तांत्रिक वस्त्रोद्योगाचे जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याकरीता “महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन” ची स्थापना करण्यात येणार आहे, विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी याचा उपयोग होईल. हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी नागपूर येथे “अर्बन हाट केंद्रां”ची स्थापना करण्यात येणार आहे. गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसायासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने जुलै, 2023 मध्ये “महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुविधा कायदा” लागू करण्यात आला आहे. उद्योजकांना त्यांच्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी तसेच नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी १7 विभागांकडून देण्यात येणाऱ्या १41 सेवा आता “मैत्री” या संकेतस्थळामार्फत देण्यात येत आहेत.

नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच नव-उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावे, यासाठी नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर, इनोव्हेशन सिटी, उभारण्यात येणार आहे. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत 10 हजार महिलांना कौशल्य व कृत्रिम बुध्दिमत्ता या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. पायाभूत सुविधा विकास
पायाभूत सुविधांमध्ये एक रुपयाची गुंतवणूक केली, तर स्थूल राज्य उत्पन्नात 2.5 ते 3.5 रुपयांची वाढ होते, हे लक्षात घेऊन विमान चालन, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जल वाहतूक, बंदर विकास, सिंचन, ऊर्जा, परिवहन व दळणवळण क्षेत्रात येत्या पाच वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा शासनाचा निर्धार आहे. “महाराष्ट्र सागरी विकास धोरण -2023” मध्ये बंदर विकासाकरीता स्वामित्वधन, अकृषिक कर, वीज शुल्क, मुद्रांक शुल्क यातून सूट देण्यात आली आहे. वीजेसाठी औद्योगिक दर लागू करण्यात आला आहे. प्रवासी जलवाहतूक व किनारी पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रवासी व बंदर करातून सूट देण्यात आली आहे. बंदरांच्या करारांचा कमाल कालावधीही 90 वर्षे करण्यात आला आहे. जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित कर‍ित आहेत. या प्रकल्पाचा एकूण खर्च 76 हजार 220 कोटी रुपये असून त्यात राज्य शासनाचा सहभाग 26 टक्के आहे.

वाढवण बंदरामुळे सुमारे 300 दशलक्ष मेट्रीक टन वार्षिक मालहाताळणी क्षमता निर्माण होणार आहे. जवाहरलाल नेहरु बंदराच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा ती तिप्पट असणार आहे. सन 2030 पर्यंत नव्या बंदरातून मालवाहतूक सुरु होणे अपेक्षित आहे. या बंदराचा समावेश कंटेनर हाताळणी करणाऱ्‍या जगातील पहिल्या 10 बंदरांमध्ये होणार असल्याने महाराष्ट्र राज्य भविष्यात सागरी दळणवळणातील महाशक्ती म्हणून उदयास येईल.

वाढवण बंदराजवळ मुंबईसाठी तिसरे विमानतळ प्रस्तावित असून मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानकही या बंदराजवळ असणार आहे. हे बंदर समृध्दी महामार्गालाही जोडण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यात मौजे मुरबे येथे बंदर निर्मितीच्या 4 हजार 259 कोटी रुपये किंमतीच्या प्रकल्पाला खाजगी क्षेत्राच्या सहभागाने मंजूरी देण्यात आली आहे. गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून मांडवा, एलिफंटापर्यंत सुरक्षित प्रवासाकरिता अत्याधुनिक सुविधायुक्त बोटींसाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचे धोरण जाहीर करण्यात येणार आहे. मुंबईत गेट वे ऑफ इंडियालगत रेडिओ क्लब येथे प्रवासी वाहतुकीकरिता सुसज्ज जेट्टीचे 229 कोटी 27 लाख रुपये किंमतीचे काम सुरु आहे.

दिघी- जिल्हा रायगड, वेंगुर्ला- जिल्हा सिंधुदुर्ग तसेच काल्हेर डोंबिवली, कोलशेत, मिरा-भाईंदर- जिल्हा ठाणे येथील जेट्टींची कामे प्रगतीपथावर आहेत. काशिद- जिल्हा रायगड येथील तरंगत्या जेट्टीचे काम लवकरच सुरु करण्यात येत आहे. हवामान बदल आणि समुद्राच्या पातळीत होत असलेल्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये 8 हजार 400 कोटी रुपये किंमतीचा बाह्यसहाय्यित प्रकल्प राबविण्यात येणार आहे. “महाराष्ट्र शाश्वत पर्यावरणपूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन” या 450 कोटी रुपये किंमतीच्या प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथे 158 कोटी रुपये किंमतीच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे समुद्रकिनारी वास्तव्यास असलेल्या नागरीकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण होईल. केंद्र सरकारने सन 2020-21 पासून भांडवली खर्चाकरिता 50 वर्ष मुदतीच्या बिनव्याजी कर्जाची “राज्यांना भांडवली गुंतवणूकीसाठी विशेष सहाय्य योजना” सुरु केली आहे. या योजनेतून राज्याला सन 2020-21 ते 2023-24 या कालावधीत 13 हजार 807 कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. सन 2024-25 मध्ये या योजनेतून सुमारे 12 हजार कोटी रुपयांचे सहाय्य अपेक्षित आहे. पूर्वनिर्धारित निकषांवर आधारित राज्याचा दीर्घकालीन व सर्वसमावेशक “अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा 2025 ते 2047” तयार करण्याचे प्रस्तावित आहे. या आराखडयामध्ये पर्यटन केंद्र, तीर्थक्षेत्र, धार्मिक स्थळं, गडकिल्ले, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्येच्या वसाहती आणि सर्व जिल्हा मुख्यालये व तालुका मुख्यालये जोडण्याकरता रस्त्यांचा समावेश करण्यात येणार आहे. आशियाई विकास बँक प्रकल्प टप्पा-1 पूर्ण झाला आहे. टप्पा- 2 मधील 3 हजार 939 कोटी रुपये किंमतीची 468 किलोमीटर रस्ते सुधारणांची कामे हाती घेण्यात आली असून त्यापैकी 350 किलोमीटर लांबीची कामे पूर्ण झाली आहेत.

टप्पा-3 अंतर्गत 755 किलोमीटर रस्ते लांबीची 6 हजार 589 कोटी रुपये किंमतीची 23 कामे हाती घेण्यात आली आहेत. सुधारित हायब्रीड ॲन्युईटी योजनेअंतर्गत 6 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. या कामांची किंमत 36 हजार 964 कोटी रुपये आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा -3 अंतर्गत 6 हजार 500 किलोमीटर लांबीची, 5 हजार 670 कोटी रुपये किंमतीची कामे मंजूर असून त्यापैकी 3 हजार 785 किलोमीटर लांबीची कामे पूर्ण झाली आहेत. सन 2025-26 साठी 1500 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-1 ची कामे पूर्णत्वास आली असून टप्पा-2 अंतर्गत 9 हजार 610 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या दर्जोन्नतीची कामे मार्च, 2026 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 अंतर्गत अतिरिक्त 7 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-3 अंतर्गत 1 हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली 3 हजार 582 गावे, 14 हजार किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याने प्रमुख जिल्हा मार्गांना, राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गांना जोडली जातील. या प्रकल्पाची एकूण किंमत 30 हजार 100 कोटी रूपये आहे. पहिल्या टप्प्यात 8 हजार कोटी रूपये रकमेची कामे हाती घेण्यात येणार आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे 99 टक्‍के काम पूर्ण झाले असून त्यासाठी 64 हजार 755 कोटी रुपये खर्च झाला आहे. इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल.

या महामार्गालगत अ‍ॅग्रो-लॉजिस्टिक हब विकसित केले जाणार असून त्यात कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकिंग व निर्यात हाताळणी केंद्राच्या प्रमुख सुविधा पुरविण्यात येतील. याचा लाभ प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यातील शेतक-यांना होईल. वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवी या 760 किलोमीटर लांबीच्या, 86 हजार 300 कोटी रुपये किंमतीच्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम ऑगस्ट, 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हीत बचत होईल आणि वाहतूक कोंडीतूनही सुटका होईल. मुंबई उपनगर परिसरातील वाहतूक गत‍िमान व्हावी यासाठी वर्सोवा ते मढ खाडीपूल, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरिवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे 64 हजार 783 कोटी रुपये किंमतीचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. ठाणे ते नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याचे नियोजन असून त्याव्दारे ठाणे, डोंबिवली, कल्याण व अन्य महत्वाची मोठी शहरे आंतरराष्ट्रीय विमानतळाशी सुलभरित्या जोडली जातील. बाळकुम ते गायमुख या ठाणे किनारी मार्गाची लांबी 13.45 किलोमीटर असून त्याचे सुमारे 3 हजार 364 कोटी रुपये खर्चाचे काम सन 2028 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतूचे वांद्रे ते वर्सोवा या दरम्यानचे 14 किलोमीटर लांबीचे, 18 हजार 120 कोटी रुपये खर्चाचे काम मे, 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. उत्तन ते विरार या सागरी सेतू व जोडरस्त्यांचा 55 किलोमीटर लांबीचा 87 हजार 427 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. पुणे ते शिरुर या 54 किलोमीटर लांबीच्या 7 हजार 515 कोटी रुपये किंमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी 6 हजार 499 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबई, नागपूर व पुणे महानगरांतील नागरिकांना पर्यावरणपूरक, शाश्वत, विनाअडथळा व वातानुकुलित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत. या सेवेचा लाभ सुमारे १० लाख प्रवासी रोज घेत आहेत.

येत्या वर्षात मुंबईमध्ये ४१.२ किलोमीटर, तर पुण्यामध्ये २३.२ किलोमीटर असे एकूण ६४.४ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत.

येत्या ५ वर्षांत एकूण २३७.५ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

नागपूर मेट्रोचा 40 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यात 6 हजार 708 कोटी रुपये किंमतीचे 43.80 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर आहे.

ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तसेच पुण्यातील स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे.

पुणे मेट्रो रेल्वे टप्पा-2 अंतर्गत खडकवासला – स्वारगेट – हडपसर – खराडी आणि नळ स्टॉप – वारजे – माणिकबाग या दोन मार्गिकांचा 9 हजार 897 कोटी रुपये किंमतीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. नवी मुंबईतील उलवे येथे 1 हजार 160 हेक्टर क्षेत्रामध्ये नव्याने विकसित होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दरवर्षी 90 दशलक्ष प्रवासी आणि 2.6 दशलक्ष टन माल वाहतुकीची क्षमता असणार आहे. या प्रकल्पाचे सुमारे 85 टक्के काम पूर्ण झाले असून चाचणी उड्डाणेही यशस्वीरीत्या पार पडली आहेत. तेथून एप्रिल, 2025 मध्ये देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्याचे नियोजन आहे. नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे खाजगी सहभागातून श्रेणीवर्धन आणि आधुनिकीकरण करण्यात येत आहे. प्रवासी आणि मालवाहतूक क्षमतेत त्यामुळे वृध्दी होईल. विदर्भाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला यामुळे चालना मिळेल. शिर्डी विमानतळाच्या 1 हजार 367 कोटी रुपये किंमतीच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली असून ती कामे सुरु आहेत. सन 2021 मध्ये शिर्डी विमानतळाला प्रमुख विमानतळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. नाईट लँडिगची सुविधाही लवकरच सुरु करण्यात येणार आहे. अमरावतीतील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले असून तेथून 31 मार्च, 2025 पासून प्रवासी सेवा सुरु करण्याचे नियोजन आहे.
रत्नागिरी विमानतळाची 147 कोटी रुपये रकमेची कामे प्रगतीपथावर आहेत.

गडचिरोली येथील नवीन विमानतळाच्या सर्वेक्षण व अन्वेषणाची कामे सुरु आहेत.

अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 6 हजार डिझेल बसचे रुपांतर सीएनजी आणि एलएनजी बसमध्ये करण्याची प्रक्रिया सुरु आहे. महामंडळाला नवीन बस खरेदीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सन 2025-26 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरीता बंदरे विभागास 484 कोटी रुपये, सार्वजनिक बांधकाम-रस्ते विभागास 19 हजार 936 कोटी रुपये, परिवहन विभागास 3 हजार 610 कोटी रुपये, नगर विकास विभागास 10 हजार 629 कोटी रुपये व ग्रामविकास विभागास 11 हजार 480 कोटी रुपये, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागास 245 कोटी रुपये, ऊर्जा विभागास 21 हजार 534 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.

Maharashtra Budget 2025 , Ajit Pawar said… We have eyes on the future generations, we dream today of tomorrow’s vision…

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023