विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ajit Pawar बनावट किंवा कृत्रिम पनीर नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याचे आहे. हे पनीर विक्री करत असलेल्या विक्रेते आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल. अनॉलॉग चीजच्या नावाखाली आर्टिफिशल पनीर किंवा फेक पनीर विक्रीबाबत संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींची बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.Ajit Pawar
ॲनालॉग चीज हा पदार्थ राज्यात ॲनालॉग पनीर, आर्टिफिशियल पनीर किंवा फेक पनीर या नावाने विक्री केल्या जात असल्याबाबत सदस्य विक्रम पाचपुते यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य कैलास पाटील यांनीही सहभाग घेतला.
उपमुख्यमंत्री पवार या खाद्यपदार्थांतील भेसळ ओळखण्यासाठी त्यांचे नमुने घेण्यात येतात. या नमुन्यांची तपासणी करून त्याचे विश्लेषण करण्यात येते. प्रयोगशाळांमधील विश्लेषणामुळे भेसळ आढळलेल्या नमुन्यांवर कारवाई करीत भेसळयुक्त पदार्थ जनतेमध्ये जाण्यापासून रोखता येतात. त्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नवीन प्रयोगशाळा, प्रयोगशाळांचे बळकटीकरण यासाठी भरीव निधी देण्यात येईल, असे सांगितले.
फेक पनीरची विक्री, साठवणूक व वाहतूक विरोधात कारवाई करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करून ते अधिक कठोर करण्यात येतील. तसेच केंद्र शासनाच्या नियमांमध्ये बदल करण्यास संबंधित केंद्रीय मंत्र्यांची चर्चा करण्यात येवून विनंती करण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत अशा पनीर विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशाराही उपमुखमंत्री पवार यांनी दिला.
विधानसभा अध्यक्षांकडे पाचपुते यांनी बनावट पनीरही दिले. आपल्या लहान मुलांना आपण अन्न म्हणून पनीरच्या नावाखाली विष खाऊ घालत आहे, हे तेलाचे गोळे आहेत, असे म्हणत विक्रमसिंह पाचपुते यांनी संताप व्यक्त केला. मी प्रश्न मांडला तर कारवाई करण्यात आली. पुणे तसेच चंद्रपूरमध्ये तब्बल 15 लाखांचे पनीर सापडले. ही बाब गंभीर आहे. याविरोधात कोणताही कठोर कायदा नाही. हा माझ्या एकट्याच्या मतदारसंघाचा प्रश्न नाही, तुम्ही पनीर खाऊन पाहा.. अशा शब्दात विक्रमसिंह पाचपुते यांनी आक्रमक भूमिका घेतली.