विशेष प्रतिनिधी
चेन्नई: DMK minister उत्तर भारतात एका महिलेला पाच-दहा नवरे असू शकतात. पाच पुरुष एका महिलेशी विवाह करू शकतात. जर एक गेला, तर दुसरा येतो. ही त्यांची परंपरा आहे, अशी मुक्ताफळे महाभारतातील द्रौपदीचा अप्रत्यक्ष संदर्भ देत तामिळनाडूतील द्रमुक सरकारमधील एका मंत्र्यांनी उधळलेली आहेतDMK minister
तामिळनाडूचे मंत्री दुरईमुरुगन यांनी गुरुवारी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे उत्तर-दक्षिण भारतातील तणाव अधिक वाढला आहे. उत्तर भारतात बहुपत्नीत्व आणि बहुपतीत्व प्रचलित असल्याचा दावा करत, तामिळ भाषेचा अपमान करणाऱ्यांची जीभ कापण्याची धमकीही त्यांनी दिली.
सीमांकनाच्या मुद्यावरून केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारमध्ये तणाव वाढत असताना हे विधान समोर आले आहे. हिंदी थोपवली जात असल्याचा आरोप द्रमुक सरकार सातत्याने करत असून, लोकसंख्येच्या नव्या आकडेवारीवर आधारित सीमांकनामुळे तामिळनाडूचे संसदेतील जागांचे प्रमाण कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एका जाहीर सभेत बोलताना दुरईमुरुगन म्हणाले, “आपल्या (तामिळ) संस्कृतीत एक पुरुष फक्त एकच विवाह करतो. मात्र, उत्तर भारतात एका महिलेला पाच-दहा नवरे असू शकतात. तसेच, पाच पुरुष एका महिलेचा विवाह करू शकतात. जर एक गेला, तर दुसरा येतो. ही त्यांची परंपरा आहे.
लोकसंख्यावाढीवरही भाष्य करताना त्यांनी म्हटले, “काँग्रेस आणि इतर केंद्रातील सत्ताधारी पक्षांनी आम्हाला लोकसंख्या नियंत्रित करण्यास सांगितले, आणि आम्ही त्यांचे ऐकले. त्यामुळे आमची लोकसंख्या कमी झाली. मात्र, उत्तर भारतात १७, १८, १९ मुले जन्माला घातली जात आहेत, जणू त्यांना दुसरे काही जबाबदारीच नाही.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संसदेत द्रमुक खासदारांवर टीका केल्यानंतर त्याचा प्रतिवाद करताना दुरईमुरुगन म्हणाले, “तुमच्या या सडलेल्या संस्कृतीतून आलेले लोक आम्हाला असंस्कृत म्हणत आहेत? आम्ही तुमची जीभ कापू. सावध राहा.”
दुरईमुरुगन यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला असून, उत्तर भारतातील विविध राजकीय नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे.