विशेष प्रतिनिधी
मुंबई : Anjali Damania बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था आणि गुन्हेगारवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शरद पवारांना चांगलेच सुनावले आहे.Anjali Damania
बीडमधील काही लोकांनी सत्तेचा गैरवापर केल्यामुळे त्याचे दुष्परिणाम गेल्या काही महिन्यांत दिसून येत असल्याचे पवार म्हणाले होते. यावर दमानिया म्हणाल्या, एक पंकजा मुंडे सोडल्या तर बीडमधील सर्वच नेते शरद पवार यांच्या तालमीत मोठे झालेत. म्हणजे धनंजय मुंडे असो, संदीप क्षीरसागर असो, सुरेश धस असो, जयदत्त क्षीरसागर असो किंवा बजरंग सोनवणे असो हे सर्वच जण शरद पवारांच्या तालमीत वाढलेत. त्यानंतरही शरद पवार बीडमधील परिस्थिती गंभीर असल्याचे म्हणत असतील तर या सगळ्या गंभीर लोकांना मोठे करण्यात त्यांचाच हातभार आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे.
अंजली दमानिया म्हणाल्या, तृप्ती देसाई यांना दोन दिवसांपूर्वी एक नोटीस बजावण्यात आली होती. त्यांच्याकडे काही पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत. हे लोक वाल्मीक कराडचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्यात. त्याचा खुलासा करण्यासाठी बीड पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. माझ्या मते, तृप्ती देसाई सोमवारी तिथे जाऊन पोलिस अधीक्षकांपुढे आपली बाजू मांडतील.माझा त्यांच्याशी संवाद झाला असून, त्यांच्याकडे पूर्ण माहिती आहे. संशयित 26 पोलिस अधिकाऱ्यांनी पदोपदी कुणाला साथ दिली? कुणाचे गुन्हे पाठिशी घातले? कोणत्या आरोपींना मदत केली? ही सर्व माहिती त्यांच्याकडे आहे. त्या 26 तारखेला सकाळी 11.30 वा. बीडच्या एसपी कार्यालयात जाऊन ही माहिती देणार आहेत. जेव्हा लोक एखादा आरोप करतात तेव्हा त्यात काहीतरी तथ्य असते ही गोष्ट सरकारने समजून घेतली पाहिजे.
शरद पवार बीडमधील कथित गुन्हेगारीवर भाष्य करताना म्हणाले होते की, बीड जिल्ह्याला मी अनेक वर्षांपासून ओळखतो. पण आजी जी बीडची अवस्था आहे तशी यापूर्वी केव्हाच नव्हती. शांत व समन्वयाने सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा जिल्हा म्हणून बीडला ओळखतो. मी स्वतः जेव्हा त्या भागात लक्ष देत होतो, तेव्हा तिथे 6-6 सदस्य निवडून आले होते. तिथे एकप्रकारचे सामंजस्याचे वातावरण होते. पण दुर्दैवाने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली. त्याचे दुष्परिणाम आपल्या गत काही महिन्यांत दिसून येत आहेत.