विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : देशाच्या व राज्याच्या राजकारणात आघाड्या, युतीची अपरिहार्य आहे, त्याची किंमत काँग्रेसने मोजलेली आहे, अशी खंत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली. Harshvardhan Sapkal
रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, युती, आघाडीमुळे कोकणात काँग्रेस निवडणुका लढू शकली नाही. इंडिया आघाडी वा मविआ म्हणून काम करत असताना काही मर्यादा व अडचणी येणे स्वाभाविक आहे. आता कोकणातही पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. सिंधुदुर्गपासून या कामाला सुरुवात झालेली आहे आणि कोकणातही काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जाणार आहेत.
सपकाळ म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्था अत्यंत बिघडलेली आहे. बीड जिल्ह्यात सरपंचाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली, त्यामागे कोण आका होता ते जनतेने पाहिले, आता आकानंतर खोक्या आला आहे. एक मंत्री खोटी कागदपत्रे दिल्याप्रकरणी दोषी ठरला आहे तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री रोज बेताल वक्तव्य करून राज्यातील शांतता व सौहार्दाला छेद देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कायदा सुव्यवस्था बिघडली आहे, कोकण व मुंबईचा घनिष्ठ संबंध आहे. कोकणातील मराठी बाणा बिघडवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.
कोकणात विपुल प्रमाणात खनिज सापडले आहे ते उद्योगपतींना द्यायचे आहे आणि याप्रकरणी कोकणातील माणूस आडवा येऊ नये म्हणून जाती धर्मात तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्ताधारी फक्त उद्योगपतींच्या हितासाठी कोकण उद्धवस्थ करू पहात आहे. शक्तीपीठ सुद्धा उद्योगपतींच्या फायद्यासाठीच केला जात आहे. बहुजन समाजातीला लोकांना गोव्याला तीर्थ पिण्यास पाठवायचे आणि उद्योगपतींना आयात निर्यात मोठ्या प्रमाणात करता यावी यासाठी हा शक्तीपीठाचा घाट घातला जात आहे.
औरंगजेब हा क्रूर शासक होता, त्याने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकले, भावाचा खून केला, लहान भावाला वेडे ठरवले. या क्रूरकर्मा औरंगजेबाला मराठी माणसाने या मातीत गाडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आम्हाला प्रमाण आहे पण भाजपाला शिवाजी महाराजांचा इतिहास व शौर्य पुसून टाकायचे आहे म्हणून एक प्रवृत्ती औरंगजेबाची कबर उखडून टाका असे सांगत आहे. औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक आहे, ते शौर्य पुसून टाकायचे षडयंत्र आहे.
भाजपा ज्या कुशीत जन्मला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, सावित्रीबाई फुले यांना छळणारा विचारही तोच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर याच विचाराने २०० वर्ष महाराजांची समाधी जनतेला कळू दिली नाही. महात्मा जोतीबा फुलेंनी महाराजांची समाधी शोधून काढली. महाराजांचा विचार व कार्य लोकांना कळू नये हा त्यामागचा डाव होता.
भाजपा संविधान मानत नाही ते सरसंघचालक गोलवकर यांचे ‘बंच ऑफ थॉट्स’ मानते, याच पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय लिहिले आहे, ते शिवेंद्रराजेंनी वाचावे. सावरकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय लिहिले ते वाचावे. भाजपाच्या पिल्लावळी छत्रपती शिवाजीराजे व संभाजीराजे यांचा सातत्याने अपमान करत आहेत. अपमान करा व संरक्षण मिळवा, अपमान करा व पुरस्कार मिळवा हे काम भाजपा करत आहे.
शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सोलापूरकर व कोरटकरला संरक्षण दिले जाते त्या सरकारमध्ये शिवेंद्रराजे भोसले आहेत, आपण हा अपमान का सहन करता? असा प्रश्न विचारून महाराजांचा अपमान करणाऱ्या सरकारमधून राजीनामा द्या, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते व माजी खासदार हुसेन दलवाई, आमदार भाई जगताप प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस रमेश कीर उपस्थित होते.
Congress paid the price for alliance politics, regrets Harshvardhan Sapkal
महत्वाच्या बातम्या
- Anjali Damania : हे सर्व जण तुमच्याच तालमीत तयार, तुम्हीच मोठे केलेत, अंजली दमानिया यांनी शरद पवारांना सुनावले
- Harshvardhan Sapkal सत्ताधारी पक्षातील लोकांकडून दहशत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
- Devendra Fadanvis : बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्ताराचा निर्णय!