विशेष प्रतिनिधी
Pune News: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) गर्भवती तनिषा भिसे यांचा झालेला मृत्यू अजूनही चर्चेचा विषय असतानाच, त्यांच्या कुटुंबीयांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जाहीर केलेली पाच लाख रुपये आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची एक लाख रुपयांची आर्थिक मदत नाकारली आहे. “आम्हाला आर्थिक मदत नको, न्याय हवा आहे,” अशी स्पष्ट भूमिका भिसे कुटुंबीयांनी घेतली आहे.
कुटुंबीयांनी ठामपणे सांगितले की, रुग्णालयातील चुकीच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशा घटना पुन्हा कधीच घडू नयेत यासाठी शासनाने गंभीर पावले उचलावीत, अशीही त्यांनी विनंती केली आहे.
यासोबतच, भिसे कुटुंबीयांनी अलंकार पोलिस ठाण्यात रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालय प्रशासनाने अंतर्गत समितीच्या अहवालाच्या नावाखाली तनिषा यांच्या IVF उपचारांची गोपनीय माहिती परवानगी न घेता उघड केली. यामुळे कुटुंबाची समाजमाध्यमांवर बदनामी झाली आणि ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.
ही वैयक्तिक माहिती जाहीर करणाऱ्या संबंधित डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी तक्रारीतून केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाने देखील पुणे पोलिस आयुक्त आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला कारवाईचे आदेश दिले आहेत. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीटद्वारे यासंदर्भातील माहिती दिली. तनिषा भिसे यांची आणि त्यांच्या कुटुंबाची वैयक्तिक माहिती परवानगीविना प्रसारित केल्यामुळे मानसिक त्रास झाल्याची तक्रार सविता भिसे यांनी आयोगाकडे केली होती.
Bhise family refuses financial aid demands justice over tanisha death at deenanath mangeshkar hospital
महत्वाच्या बातम्या