विशेष प्रतिनिधी
पुणे : छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. मात्र या चित्रपटाची चित्रफीत बेकायदेशीरपणे सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर माणिक रंधावन (रा. दौंड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सागर रंधावनने ‘छावा’ चित्रपट सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी होस्टिंगर या वेबसाईटचा वापर केला. त्यानंतर त्याने एक ॲप तयार केले. यानंतर विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत या चित्रपटाच्या लिंक्स अपलोड केल्या.
या चित्रपटाची लिंक मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर ऑगस्ट इंटरटेनमेंट या चित्रपट निर्मिती कंपनीने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. यानंतर पोलिसांनी सागर रंधावन याला अटक केली. याप्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या या घटनेचा पुढील तपास मुंबई सायबर पोलीस करत आहेत.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने करोडोंची कमाई केली. मात्र दुसरीकडे या चित्रपटाला पायरसीचे ग्रहण लागले. हा चित्रपट इंटरनेटवर १८१८ लिंक्स तयार करून व्हायरल करण्यात आला. ‘छावा’ हा चित्रपट व्हायरल केल्याप्रकरणी रजत राहुल हक्सर यांनी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 316(2) आणि 308(3) अंतर्गत कॉपीराईट कायद्याच्या कलम 51, 63, आणि 65A सह सिनेमॅटोग्राफ कायदा, 1952 चे कलम 6AA (सुधारणा आणि तंत्रज्ञान अधिनियम 236 आणि माहिती 2360 च्या कलम 360) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
‘छावा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले होते. या चित्रपटात विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकला होता. तर त्यांची पत्नी येसुबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदानाने साकारली होती. तसेच औरंगजेब ही भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. या चित्रपटात अनेक मराठी कलाकारही झळकले होते.
Arrested for illegally making ‘Chhawa’ viral on social media
महत्वाच्या बातम्या