विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य सरकारने लागू केलेल्या नवीन शालेय अभ्यासक्रम आराखड्याअंतर्गत पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असून यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. हिंदी सक्तीचा निषेध करत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “माझ्या महाराष्ट्रात हिंदी सक्ती खपवून घेतली जाणार नाही!”
राज ठाकरे म्हणाले की, “केंद्र सरकार सध्या सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु महाराष्ट्रात हे यशस्वी होऊ दिले जाणार नाही. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, ती देशातील इतर भाषांसारखीच एक राज्यभाषा आहे. मग ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकवायची?”
ते पुढे म्हणाले, “भाषावार प्रांतरचना ही देशाच्या स्थैर्यासाठी महत्त्वाची होती. परंतु आता या तत्त्वालाच हरताळ फासला जात आहे. इतर राज्यांत जशी स्थानिक भाषा सन्मानाने शिकवली जाते, तसाच सन्मान मराठी भाषेलाही मिळायला हवा.”
राज ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका करत म्हटलं की, “आर्थिक अडचणीत असलेलं राज्य, बेरोजगार तरुण, कर्जमाफीची प्रतिक्षा करणारे शेतकरी, आणि राज्याकडे पाठ फिरवणारे उद्योगपती – यावर बोलायला सरकारकडे काहीच नाही. त्यामुळे ‘फोडा आणि राज्य करा’ या जुन्या ब्रिटिश नीतीचा अवलंब केला जातोय.”
हिंदी सक्तीचा मुद्दा केवळ महाराष्ट्रापुरता का आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “दक्षिणेतील राज्यांमध्ये अशी सक्ती का केली जात नाही? कारण तिथली सरकारं ती मान्य करणार नाहीत. पण महाराष्ट्रात सत्तेत असलेले घटक पक्ष निमूटपणे हे खपवून घेत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मात्र गप्प बसणार नाही.”
राज ठाकरे यांनी शाळांना देखील इशारा दिला की, “हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत, शाळांनी ती विद्यार्थ्यांना वाटू नयेत, याची नोंद घ्यावी.”
शेवटी त्यांनी सर्व मराठी जनतेला, प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या मराठी बांधवांना आणि इतर राजकीय पक्षांनाही आवाहन केलं. “कोणताही वाद न करता, हिंदी सक्तीचा निषेध करा. ही फक्त भाषा नाही, तर अस्मितेचा प्रश्न आहे. आज भाषा लादत आहेत, उद्या इतर गोष्टीही लादतील. म्हणूनच आता विरोध नोंदवणं आवश्यक आहे.”
राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे की, जर सरकारने लोकभावनेचा आदर करत हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला नाही, तर राज्यात संघर्ष अटळ असून त्यासाठी जबाबदार फक्त सरकारच असेल.
Raj Thackeray warns on Hindi compulsion, Maharashtra Navnirman Sena strongly opposes
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : खुर्ची बदलली असली तरी विकासाचे विमान आणि इंजिनही तेच , एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
- Mahagyandeep : देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
- Kalakendra Artists : तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती, आशिष शेलार यांची माहिती
- NCW अध्यक्षा विजयाताई रहाटकर उद्यापासून हिंसाचारग्रस्त बंगाल दौऱ्यावर; मुर्शिदाबाद, मालद्यात जाऊन देणार पीडित कुटुंबीयांना आधार!!