विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काश्मीर संदर्भात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी दिलेल्या वक्तव्यानंतर अमेरिकेच्या आघाडीच्या थिंक टँक ‘अमेरिकन एंटरप्राइझ इन्स्टिट्यूट’चे वरिष्ठ सदस्य आणि पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकेल रुबिन (Michael Rubin) यांनी पाकिस्तानवर आणि असीम मुनीर यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे.
असीम मुनीर यांनी अलीकडेच काश्मीरला पाकिस्तानच्या “गळ्याची नस” म्हटले होते आणि मोहम्मद अली जिना यांच्या द्विराष्ट्र सिद्धांतावर भर दिला होता. यावर प्रत्युत्तर देताना मायकेल रुबिन म्हणाले, “असीम मुनीर यांचे हे वक्तव्य म्हणजे दहशतवादाला हिरवा कंदील दाखवण्यासारखे आहे. जर काश्मीर पाकिस्तानच्या गळ्याची नस असेल, तर आता भारताने त्या गळ्यालाच छाटणं गरजेचं झालं आहे. यात आता कोणताही शॉर्टकट नाही.”
रुबिन यांनी असीम मुनीर यांची तुलना थेट अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनशी केली. “फरक इतकाच की बिन लादेन गुहेत लपला होता आणि मुनीर महालात राहतो,” अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली. त्यांनी अमेरिकेकडे मागणी केली की, पाकिस्तानला अधिकृतपणे दहशतवादाला खतपाणी घालणारा देश घोषित करावे आणि असीम मुनीरला दहशतवादी ठरवावे.
हल्ला घडवून आणण्याची वेळ ही अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या भारत भेटीशी साधूनच ठरवण्यात आली होती. ज्यामुळे पाकिस्तानने अमेरिकेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. याआधीही बिल क्लिंटन यांच्या भारत दौऱ्यादरम्यान असा हल्ला झाला होता, अशी आठवण त्यांनी करून दिली.
पाकिस्तानकडून सातत्याने दहशतवादाचा निषेध केल्याचे भासवले जाते, मात्र वास्तवात तो दहशतवादाला पाठिंबा देतच आहे, असा ठपका रुबिन यांनी ठेवला. “तुम्ही डुकराला कितीही लिपस्टिक लावा, तरी तो डुक्करच राहतो,” असा बोचरा टोमणाही त्यांनी पाकिस्तानला लगावला.
रुबिन यांनी पहलगामच्या हल्ल्याची तुलना हमासने इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्याशी केली. “दोन्ही ठिकाणी शांततेत राहणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करण्यात आले. इस्रायलमध्ये उदारमतवादी ज्यू, तर भारतात मध्यमवर्गीय हिंदू,” असं ते म्हणाले. “जसं इस्रायलने हमासचा बंदोबस्त केला, तसं आता भारताने पाकिस्तान आणि आयएसआयचा बंदोबस्त करायला हवा.”
आयएसआयला थेट दहशतवादी गट ठरवण्याची वेळ आली असल्याचे सांगत रुबिन म्हणाले, “भारतानं केवळ कारवाई केली पाहिजे असं नव्हे, तर भारताच्या मित्र देशांनीही या मागणीला पाठिंबा दिला पाहिजे.”
शेवटी, पाकिस्तानात लष्कर-ए-तैयबासारख्या अनेक दहशतवादी संघटनांचा उल्लेख करत रुबिन म्हणाले, “पश्चिम देशांना पाकिस्तानच्या राजनैतिक नेत्यांनी फसवलं आहे, त्यामुळे दहशतवादविरोधी कारवायांमध्ये खंड पडलाय. हे आता थांबायला हवं.”
If Kashmir is Pakistan’s jugular vein, India should cut its throat now, says American think tank member Michael Rubin
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : उध्दव – राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले
- Chief Minister : तंत्रज्ञानाच्या मदतीने शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा, मुख्यमंत्र्यांचे डाॅक्टरांना आवाहन
- Supreme Court : मग संसद भवनच बंद करा.. उपराष्ट्रपतींपाठाेपाठ भाजपचे खासदार सर्वाेच्च न्यायालयावर बरसले
- West Bengal : हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागातील महिलांची राज्यपालांपुढे कैफियत