विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कथित घोटाळ्यात १४ वर्षांनंतर मोठी घडामोड घडली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीतील राऊस अव्हेन्यू कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला असून, न्यायालयाने तो स्वीकारला आहे. परिणामी, कलमाडी आणि इतर सर्व आरोपींना या प्रकरणातून पूर्णपणे मुक्तता मिळाली आहे.
यूपीए सरकारच्या कार्यकाळात उघडकीस आलेल्या या कथित घोटाळ्यात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनामध्ये आर्थिक अनियमिततेचा आरोप करण्यात आला होता. सीबीआयने आरोप केला होता की, एका स्विस कंपनीला चुकीच्या पद्धतीने कंत्राट देऊन सरकारला सुमारे ९० कोटी रुपयांचे नुकसान झाले. याच प्रकरणात कलमाडी यांना २४ एप्रिल २०११ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर नऊ महिन्यांनी त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला.
तपासादरम्यान, सीबीआयने असा आरोप केला होता की, गेम्स वर्कफोर्स सर्व्हिसेस (GWS) आणि गेम्स प्लॅनिंग, प्रोजेक्ट अँड रिस्क मॅनेजमेंट सर्व्हिसेस (GPPRMS) या कंपन्यांना कंत्राटे देताना नियमबाह्य वागणूक झाली होती. EKS आणि Ernst & Young यांच्या संघाला जाणूनबुजून लाभ मिळवून दिला गेल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, २०१४ मध्ये सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल करताना नमूद केले की, कोणतेही खटला चालवण्याजोगे ठोस पुरावे उपलब्ध झालेले नाहीत.
सीबीआयच्या निष्कर्षावर आधारित, ईडीने मनी लाँड्रिंग विरोधी कायदा (PMLA) अंतर्गत स्वतंत्र तपास सुरू केला होता. मात्र, वर्षानुवर्षे सखोल चौकशी करूनही ईडीला कोणतेही दोष सिद्ध करता आले नाहीत. परिणामी, ईडीने स्वतःच क्लोजर रिपोर्ट दाखल केला आणि विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी सोमवारी तो स्वीकारला.
न्यायालयाने नमूद केले की, PMLA च्या कलम ३ अंतर्गत कलमाडी किंवा अन्य आरोपींविरोधात कोणताही गुन्हा सिद्ध झाला नाही. तपासादरम्यान कोणतेही पुरावे मिळाले नसल्यामुळेच सर्वांना क्लीन चिट देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे भारताच्या सर्वात चर्चिलेल्या आणि दीर्घकालीन घोटाळ्यांपैकी एकाचा शेवट झाला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांनंतर कलमाडी यांची राजकीय कारकीर्द जवळपास संपुष्टात आली होती. कायदेशीर दृष्टिकोनातून आता त्यांना दिलासा मिळाला असला, तरी सार्वजनिक स्तरावर राष्ट्रकुल घोटाळा हा अजूनही भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर झालेल्या मलिनतेचे उदाहरण म्हणून पाहिला जातो.
Suresh Kalmadi gets clean chit after 14 years in Commonwealth Games scam
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती