विशेष प्रतिनिधी
मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती (Deven Bharti) यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे आयुक्त विवेक फणसाळकर यांची आज सेवानिवृत्ती होत असून, त्यांच्या जागी भारती यांनी कार्यभार स्वीकारला आहे.
देवेन भारती हे १९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांचा मुंबई पोलिस दलात मोठा अनुभव आहे. त्यांनी डीसीपी (गुन्हे), सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख (ATS), तसेच विशेष पोलीस आयुक्त (मुंबई) अशी अनेक जबाबदारीची पदे यशस्वीरित्या सांभाळली आहेत.
२६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतरच्या तपासामध्ये आणि त्यानंतर सुरक्षा यंत्रणांच्या मजबूत संरचनेत देवेन भारती यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांनी गुन्हेगारी गटांविरोधात कठोर कारवाया केल्या असून, अंडरवर्ल्ड विरोधी मोहिमा, सायबर गुन्हे, आणि प्रकरणांच्या जलद तपासासाठी ते ओळखले जातात.
२०१४ ते २०१९ या कालावधीत जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा भारती यांनी कायदा व सुव्यवस्था विभागाचे सह पोलीस आयुक्त म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू अधिकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे.
या नियुक्तीमुळे एकदा पुन्हा मुंबई पोलीस आयुक्तपदाचा दर्जा महासंचालक (DG) वरून खाली आणून अतिरिक्त महासंचालक (ADG) स्तरावर करण्यात आला आहे. हे पद पूर्वी ADG दर्जाचेच होते, परंतु २०१५ मध्ये त्यात सुधारणा करून DG दर्जा देण्यात आला होता.
मुंबई शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. सायबर गुन्हेगारीतील वाढ, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न, तसेच शहरातील गून्हेगारी नियंत्रण यांसारख्या बाबींवर लक्ष केंद्रित करत, भारती यांच्या नेतृत्वात मुंबई पोलीस दलाची कार्यक्षमता अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या कार्यकाळात गुप्तचर यंत्रणा मजबूत करणे, शहरी सुरक्षा यंत्रणा अद्ययावत करणे, सामाजिक सलोखा राखणे, तसेच पोलीस दलाच्या प्रतिमेचा उन्नतीकरण यावर भर दिला जाईल.
Deven Bharti appointed as Mumbai Police Commissioner
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती