वाई – खंडाळा – महाबळेश्वर मतदारसंघ मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे. शरद पवारांचे एकेकाळचे कट्टर विरोधक आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांच्या नातवाला शरद पवार बळ देणार का असा प्रश्न सध्या मतदारसंघात चर्चेला जात आहे.
आमदार मकरंद पाटील यांनी सलग तीन वेळा मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघात बाजी मारली आहे. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी शरद पवारांकडे तगडा उमेदवारच नसल्याचे चित्र आहे. यामध्ये आता ते शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांना सोबत घेतात की प्रतापराव भोसले यांचे नातू आणि मदन भोसले यांचे चिरंजीव यशराज भोसले यांना तिकीट देतात हा प्रश्न आहे. अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार गटात जाण्याची चर्चा असल्याने त्यांचे पुतणे आणि फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे यांच्या नावाचीही चर्चा आहे. मात्र विश्वजीत राजे यांनी आपले मित्र यशराज यांच्या पारड्यात आपले मत दिले आहे. यशराज भोसले यांनाच तिकीट द्यावे अशी मागणी त्यांनी शरद पवारांकडे केली आहे.
सध्या या मतदारसंघात राष्ट्रवादीचे शरद पवार गटाकडे इच्छुकांची संख्या जास्त असली, तरी सर्व जण नवखे आहेत. एखादा उद्योजक किंवा डॉक्टरउमेदवार रिंगणात उतरविण्याचाही प्रयत्न राष्ट्रवादी पवार पक्षाकडून होऊ शकतो.
मकरंद पाटील यांनी किसन वीर व खंडाळा कारखान्यांची मागील बाकी ऐन निवडणुकीच्या तोंडावर देऊन त्यांनी सभासदांना खूष केलेले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण यावर सर्व गणित अवलंबून आहे
विधानसभा मतदारसंघात युतीमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरु आहे. महायुतीत ही जागा कोण लढवणार, यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरु आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांनी वाईच्या जागेवर दावा ठोकला आहे. शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्र महाबळेश्वर येथून जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली आहे. वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी पुरुषोत्तम जाधव यांनी जनसंवाद यात्रेत नागरिकांशी संवाद साधण्यास सुरवात केली आहे. “एकाच घरामध्ये सर्व पदे मग वाई मधील इतर कार्यकर्ते मेले आहेत का? असा सवाल ते करत आहेत
पुरुषोत्तम जाधव यांचे म्हणणे आहे की मी लोकसभा निवडणूकही लढणार होतो पण मला देवेंद्र फडणवीस यांनी थांबवलं. त्या निवडणुकीत मी एक ते दीड लाख मत घेतली असती तर महायुतीचे उमेदवार धोक्यात आले असते. दरवेळी मला थांबवले जात, आम्ही सर्वसामान्यांनी राजकारणात यायचं की नाही असा प्रश्न आम्हाला पडला आहे.
आतापर्यंत खंडाळा तालुक्याला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही, मी गेली वीस-बावीस वर्ष संघर्ष करतोय. असे सांगून खंडाळा तालुक्याचे अस्मिता जागृत करण्याचा प्रयत्नही ते करत आहेत.
दुसऱ्या बाजूला मकरंद पाटील यांचे पारंपरिक विरोधक भाजपचे मदन भोसले यांच्या घरी राष्ट्रवादीचे जयंत पाटील चहा पिऊन गेले. मदन भोसले यांनी राष्ट्रवादीत येण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे मकरंद पाटील यांच्या विरोधातील उमेदवाराला मदन भोसले यांचा आतून पाठिंबा असेल. सडक तीन वेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ते आपले चिरंजीव यशराज भोसले यांना शरद पवार गटात पाठवू शकतात.
मकरंद पाटील, पुरुषोत्तम जाधव आणि मदन भोसले असे तीन तगडी नेते असतानाही लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले दहा हजारावर मतांनी पिछाडीवर गेले होते. पवारांच्या राष्ट्रवादीकडे एकही मोठा नेता नसताना तिसर्या फळीच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर या मतदार संघात शशिकांत शिंदे मोठे मताधिक्य घेतात, ही मकरंद पाटील यांच्यासाठीही धोक्याची घंटा आहे.
त्यामुळे येथील मतदार शरद पवार यांच्या विचारांना मानणारा असल्याने तुतारी गटाकडून लढण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे
लोणंदचे डॉ. नितीन सावंत, खंडाळ्याचे बंडू ढमाळ, वाईचे काँग्रेसचे विराज शिंदे, अॅड. नीलेश डेरे, माजी उपसभापती अनिल जगताप तयारीत आहेत. माजी मंत्री मदन पिसाळ यांच्या सूनबाई व माजी जि.प. अध्यक्षा अरूणादेवी पिसाळ यांचेही नाव चर्चिले जात आहे. मात्र, अद्याप त्यांची तयारी दिसत नाही.
विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर यांच्या गटाने शरद पवार गटात प्रवेश केल्याने त्यांचा प्रभाव या मतदारसंघावर राहू शकतो. त्यामुळेच मकरंद पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार येण्याची शक्यता आहे. रामराजेंचे बंधू रघुनाथ राजे यांचे चिरंजीव विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी मैदानात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. विश्वजितराजे वाई व खंडाळ्यात गाठीभेटी घेत असल्यामुळे जुनी समीकरणे नव्याने मांडण्याची त्यांची तयारी दिसत आहे. मात्र बाहेरचा उमेदवार म्हणून त्यांना विरोध होऊ शकतो. त्यामुळेचवाईतून उमेदवारी मला नाही, तर माझ्या मित्राला म्हणजेच स्वर्गीय माजी खासदार प्रतापराव भोसले यांचे नातू यशराज भोसले यांना मिळाली पाहिजे, असे माझं व्यक्तिगत मत आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
Wai Vidhansabha
महत्वाच्या बातम्या
- Narendra Modi : मोदी बनले भाजपचे पहिले सक्रिय सदस्य; पंतप्रधानांनी सदस्यत्व मोहिमेला केली सुरुवात
- NCP SP : पवारांच्या राष्ट्रवादीत आलेत नेते 10, 7 वाटेवर; पण “चाणक्य खेळी”च्या बातम्या शेकड्यांवर!!
- CJI Chandrachud : संविधान बदलाच्या नॅरेटिव्हला सरन्यायाधीशांची थप्पड; ब्रिटिशकालीन न्याय देवतेचे भारतीयीकरण!!
- Supreme Court : फ्रीबीजवरून सुप्रीम कोर्टाची केंद्रासह निवडणूक आयोगाला नोटीस; याचिकाकर्त्यांची बंदीची मागणी