विशेष प्रतिनिधी
शिरूर विधानसभा मतदारसंघातील आगामी विधानसभा निवडणूक चुरशीची होणार असल्याची चिन्हे आहेत. शिवसेना नेते (ठाकरे गट) माऊली कटके यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे,. विद्यमान आमदार अशोक पवार यांच्याविरुद्ध कटके यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या मतदारसंघातून इच्छुक असलेले अजित पवार यांचे निकटवर्तीय प्रदीप कंद यांचा पत्ता कट झाला की त्यांनी स्वतःहून माघार घेतली अशी चर्चा रंगू लागली आहे.
अजित पवार यांनी अशोक पवारांना ‘तू निवडून कसा येतोस’ असा थेट इशारा दिला होता. अजित पवार यांची निकटवर्ती प्रदीप कंद यांचे नाव देखील उमेदवारीसाठी पुढे आले होते. कंद हे सध्या भाजपमध्ये असले तरी अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.
शिरूर – हवेली मतदार संघाची भाजप की राष्ट्रवादी
अजित पवार गट अशी रशशीखेच सुरू होती. भाजपचे इच्छुक उमेदवार प्रदीप कंद व कटके हे उमेदवारी साठी जोरदार प्रयत्न करीत होते. हा मतदार संघ भाजप कडेच राहील अशी खात्री भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना होती. कटके व कंद हे दोघेही मुंबईत ठाण मांडून होते.
राष्ट्रवादी अजित पवार गटाने व भाजपनेही या मतदार संघातील उमेदवारी जाहीर केली नव्हती. कटके यांनीही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उमेदवारी मिळेल अशी खात्री बाळगली होती. यामुळे महायुती मध्ये या उमेदवारी साठी जोरदार रस्सी खेच सुरू होती. आज कटके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश म्हणजे त्यांच्या उमेदवारीची निश्चितीच मानली जाते.
शिरूर विधानसभा मतदारसंघात अशोक पवार हे एक विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीनंतर जिल्ह्यातील एकमेव आमदार शरद पवार यांच्या सोबत राहिले होते. त्यामुळे त्यांना पराभूत करण्याचा चंग अजित पवारांनी बांधला आहे.
शिरूरमध्ये अजित पवारांनी माऊली कटके यांच्या रूपाने ठाकरे गटाला धक्का दिला आहे. अशोक पवारांसाठी हा आव्हानात्मक काळ असणार आहे.