विशेष प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला हट्ट कायम ठेवल्याने पाटण विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजित पाटणकर बंडखोरीच्या तयारीत आहेत. या ठिकाणी ठाकरे गटाने हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर केल्याने शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाई यांचा विजय सोपा झाला आहे
पाटण विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना शिंदे गटातून मंत्री शंभुराज देसाई यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सत्यजितसिंह पाटणकर की शिवसेना ठाकरे गटाचे हर्षद कदम अशी चर्चा होती. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे हर्षद कदम यांचे शिवसेनेच्या पहिल्या यादीत नाव आले. या मतदारसंघात देसाई – पाटणकर यांच्यात पारंपरिक लढत असलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीतून हर्षद कदम यांचे नाव जाहीर झाल्याने राष्ट्रवादीचे सत्यजितसिंह पाटणकर यांची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीचा निर्णय प्रलंबित असताना पाटण विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर बदल होऊ शकतो. असे पाटणकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचे मत आहे. 1999 च्या निवडणुकीत शंभुराज देसाई यांनी शिवसेनेतून पहिली निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2004 च्या निवडणुकीत शिवसेनेतून निवडून आले. 2009 साली पुन्हा त्यांचा पराभव झाला. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत शंभुराज देसाई शिवसेनेतून सलग निवडून आले.
1999, 2004, 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रमसिंह पाटणकर यांच्याशी लढत झाली तर 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांच्याशी लढत झाली. पारंपरिक लढत असलेल्या या मतदारसंघात मागील पाच निवडणूका शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अशीच झाली आहे. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे शंभुराज देसाई निवडून आल्याने हा मतदार संघ शिवसेनेचाच मानला जात आहे. मात्र या मतदारसंघात पक्षीय राजकारणापेक्षा गटा – तटाच्या राजकारणाच्या पाठीमागे मतदार असल्याने मतदारसंघात देसाई – पाटणकर असेच तुल्यबळ दोन गट आहेत.
अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या सत्तांतराच्या घडामोडीत शिवसेनेत दोन गट पडल्याने शंभुराज देसाई शिवसेना शिंदे घटात डेरेदाखल झाले. 2024 च्या चालू विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे शिंदे गट आणि ठाकरे गट समोरासमोर उभे टाकले असताना पाटण विधानसभा मतदार संघावर शिवसेना ठाकरे गटाने दावा सांगितला. तशी तयारी देखील त्यांनी सुरू केली. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ पातळीवरील घडामोडीवर काय घडामोडी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना शिवसेना ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांचे नाव जाहीर झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पारंपरिक निवडणूकीला यावेळी खंड पडणार का..? असा प्रश्न सर्वांसमोर पडला असताना राष्ट्रवादीचे सत्यजितसिंह पाटणकर शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडीकडे ताकद लावणार का महाविकास आघाडीला साथ देणार की अपक्ष लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सातारा जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघात ठाकरेंकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. या मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. याशिवाय पाटणकरांचं देखील या मतदारसंघावर वर्चस्व आहे. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आला.
हर्षद कदम यांनी सातत्याने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठवली असतानाच त्यांना उमेदवारी जाहीर झाल्याने ठाकरे गटामध्ये उत्साह पाहावयास मिळत आहे. त्याचवेळी पाटणकर समर्थकांमध्ये मात्र खळबळ उडाल्याचे दिसून आले. मविआमध्ये हा उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना ‘दे धक्का’ असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मविआत ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.
शंभूराजे देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचे ठरवल्यावर ठाकरे गटाने सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून मल्हारपेठ (ता. पाटण) येथील हर्षद कदम यांना जिल्हाध्यक्ष पद देत जिल्ह्याची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर हर्षद कदम यांनी सातत्याने मंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात अक्षरशः रान उठवले आहे. मागील महिन्यात मंंत्री देसाई यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत हर्षद कदम यांनी जनआक्रोश मोर्चाही काढला होता. तेव्हापासून मंत्री शंभूराज देसाई समर्थक व हर्षद कदम समर्थकांमध्ये कलगीतुरा सुरू आहे. त्यातच आता महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून हर्षद कदम व महायुतीचे उमेदवार म्हणून मंत्री शंभूराज देसाई यांच्यात लढत होणार असल्याने पाटणकर गटाची भूमिका काय असणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. दुसरीकडे देसाई व पाटणकर गट कायम आमने सामने लढले आहेत. दोघांमध्ये मतांचा फरकही कधी शेकड्यातही राहिला आहे. त्यामुळे पाटणकरांचा पत्ता मविआतून कट झाल्याने पाटणसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. पाटणकर गटाला फार मोठा धक्का बसला आहे.
Patan Vidhansadha election 2024
महत्वाच्या बातम्या
- Nura Kushti माहीममध्ये नुरा कुस्ती की शिंदेंचा शिलेदार राज ठाकरेंच्या लेकाला झुंजविणार
- Uddhav Thackeray उध्दव ठाकरेंनी वाढवले महाविकास आघाडी टेन्शन, सांगोल्यातून दीपक साळुंखे यांना उमेदवारी जाहीर
- Shiv Sena शिवसेना शिंदे गटाची 45 उमेदवारांची यादी जाहीर, बहुतांश विद्यमान आमदार
- Amit Thackeray : मनसेचे ठरले, अमित ठाकरे माहीम मधून लढणार, खडकवासल्यात मयुरेश वांजळे