विशेष प्रतिनिधी
पुणे: परवानाधारक दुकानदार यांनी प्रामाणित खते, बी-बियाणे घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करावे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांनावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिला.
ग्रामोन्नती मंडळ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्यावतीने ९ ते १२ जानेवारी कालावधीत आयोजित ‘ग्लोबल कृषी महोत्सव’ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार शरद सोनवणे उपस्थित होते.
ॲड. कोकाटे म्हणाले, शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न असून त्यांना या क्षेत्रात सुरक्षितता उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. कृषी महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा उपयोग कृषी क्षेत्राला झाला पाहिजे, त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. यादृष्टीने त्यांनी तांत्रिक शेती, विविध संशोधन, दर्जेदार बी-बियाणे, खत उत्पादन, आदी बाबींवर भर दिला पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. शेती आणि बाजारपेठ परस्परपूरक बाबी असल्याने शेतीमाल ते बाजारपेठ अशी साखळी निर्माण करण्याची गरज आहे.
राज्यात विविध पीकपद्धती घेतली जाते, पारंपरिक पीकपद्धती आणि आधुनिक पीकपद्धती यांच्यामधील फरक समजून घेतला पाहिजे. अनेक शेतकरी प्रयोगशील असून कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रयोग करीत असतात. त्यांचे अनुकरण केले पाहिजे. शेतकऱ्यांनी शेतात नवनवीन तंत्रज्ञान वापरून अधिकाधिक उत्पादन घेतले पाहिजे, याकरीता राज्यशासन आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील. शेतीशी संबंधित केंद्र शासनाशी निगडित प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री यांच्याशी चर्चा सुरु आहे, आगामी काळात केंद्र शासन आणि राज्य सरकार मिळून यामध्ये सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व प्रकारच्या सेवा शेतकऱ्यांना एका क्लिकवर मिळाव्यात याकरीता लवकरच उपयोजक (ॲप) विकसित करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासोबतच त्यांच्या वेळेत बचत होईल तसेच पारदर्शक पद्धतीने त्यांच्या खात्यात लाभाचे हस्तांतरण होईल. पीक नुकसानीचे पंचनामे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्यासोबतच पीकविम्याच्या अनुषंगाने अडचणी दूर करण्यात येईल. कृषी विद्यापीठाच्या जमिनी कृषी विज्ञान केंद्र तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर देण्याचा विचार आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, शेतीतील पिकाची शाश्वती, शेतमालाला हमीभाव मिळवून शेतकऱ्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन धोरण तयार करण्यात येईल, असे आश्वासन ॲड. कोकाटे यांनी दिले.
आमदार सोनवणे म्हणाले, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्याची सेवा करणारे खाते म्हणून कृषी विभागाकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, शेतकऱ्यांला कमी खर्चात अधिक उत्पन्न, शेतमालाला हमीभाव, अद्ययावत शेतकरी भवन, दूध अनुदान, पशुधनासाठी लसीचा पुरवठा, परिसरात बिबट्याची संख्या लक्षात घेता दिवसा वीज उपलब्ध करणे आदी प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांकरीता लोककल्याणकारी धोरण राबविण्याच्या श्री. सोनवणे यांनी सूचना केल्या.
Crimes against companies that cheat farmers, Minister of Agriculture Adv. Manikrao Kokate’s warning
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली