विशेष प्रतिनिधी
मुंबई : अनेक धक्के बसत आहेत. मी धक्का पुरूष झालो आहे. कोण किती धक्के देतायेत बघुया, असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. एप्रिल-मे महिन्यात मुंबई महापालिका निवडणूक लागू शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर अनेकांनी ठाकरेंच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ ठोकला आहे. अलीकडेच माजी आमदार राजन साळवी यांनी सुद्धा ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी हे विधान केले असून विरोधकांवर निशाणा साधत चॅलेंज दिले आहे. ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसैनिकांना उद्धव ठाकरे बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी कुर्ला, कलिना येथील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. विभाग प्रमुखपदी सोमनाथ सापळे यांची नियुक्ती झाल्यानंतर पदाधिकारी भेटायला आले होते, यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “माझी जपानसारखी परिस्थिती झाली आहे. असे म्हणतात की, जपानमध्ये भूकंपाचा धक्का बसला नाही, तर लोक आश्चर्य व्यक्त करतात. तसे, रोज मला धक्क्यांवर धक्के बसतायेत. मी धक्का पुरूष झालो आहे. आणखी कोण किती धक्के देतायेत बघुया. आपण एकदाच असा धक्का देऊ की पुन्हा हे दिसता कामा नये.
“ही लढाई एकट्यादुकट्याची नाही. ही सर्वांची लढाई आहे. आपल्याच लाकडाच्या दांड्याची कुऱ्हाड बनवून मराठी माणसाच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. एप्रिल किंवा मे महिन्यात मुंबई महापालिका निवडणूक लागण्याची शक्यता आहे, असे ठाकरे यांनी म्हटले.
सैनिक म्हटल्यावर शिस्त आली पाहिजे. लढाई एकट्याची नाही, ही लढाई आपली आहे. सगळ्यांनी छावा सिनेमा आवर्जून बघा. जे जे लोक बाहेर येतात ते डोळे पुसत बाहेर येत आहेत. डोळे उघडून सर्वांनी हा सिनेमा बघा. संघटनात्मक बांधणी करण्याचे आता दिवस आहेत. सुप्रीम कोर्टातील निकाल लागण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल-मेमध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. मग सर्वांनी दिलेली कामे शाखेनुसार करा. विधानसभेत जो अनुभव आला तो अनुभव लक्षात घेता जी चूक झाली ती आता चूक होणार नाही याची काळजी घ्या”, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केले.