Rahul Gandhi गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील राजकारणात काँग्रेस पक्षाच्या घसरणीचा आलेख सातत्याने खालच्या पातळीवर जात असतानाही, पक्षाचे अघोषित सर्वेसर्वा राहुल गांधी मात्र आपल्या ठराविक आणि अप्रभावी शैलीतून बाहेर येण्यास तयार दिसत नाहीत. गुजरातमधील अहमदाबाद येथे नुकतेच पार पडलेले काँग्रेसचे ८४वे राष्ट्रीय अधिवेशन ही याच अपयशाची पुनरावृत्ती ठरले.
अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर असले तरी संपूर्ण अधिवेशनावर राहुल गांधींच्या अनुत्तरदायित्वाची छाया होती. राहुल गांधी यांच्याच नेतृत्वाखाली सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाने दारुण पराभव पत्करला आहे. अधिवेशनात त्यांनी पुन्हा एकदा जुन्याच भाषणाच्या टेप वाजवल्या. आरएसएसवर टीका, भाजपा आणि सावरकरांवर आरोप, आणि “आपणच खरे पर्याय” असे म्हणण्याचा फसलेला प्रयत्न. पण हाच प्रश्न उभा राहतो की, मग वास्तविक निवडणुकांमध्ये विजय का मिळत नाही?
राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा व नंतर मणिपूर ते मुंबई अशी दुसरी यात्रा काढली, जनतेचा प्रतिसादही मिळाला. पण केवळ पदयात्रा करून निवडणुकीत यश मिळते का? एकीकडे ते यात्रेत लाखो लोकांसोबत चालताना दिसतात, पण निवडणुकीच्या प्रचारावेळी अचानक अदृश्य होतात. सुट्टी घेऊन परदेशात जातात. अशा नेत्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवायचा तरी कसा?
सर्वसामान्य कार्यकर्ते अधिवेशनात प्रश्न विचारतात – “राहुल गांधी आहेत तरी कुठे?”—यावर पक्षाकडे उत्तर नाही. नेतृत्वाच्या या अनिश्चिततेमुळे काँग्रेसमध्ये जान नाही, ऊर्जा नाही आणि दिशा नाही.
राहुल गांधी हे प्रत्येक भाषणात संघ-भाजपवर टीका करतात, पण गंभीर व संवेदनशील मुद्यांवर संसदेत भाषण करताना ते बहुधा अनुपस्थित असतात. वक्फ कायद्यावरील चर्चेतही त्यांनी भाग घेतला नाही. प्रियंका गांधीसुद्धा संसदेत दिसल्या नाहीत. विरोधी पक्ष नेत्याची भूमिका पार पाडण्याची त्यांची इच्छा आहे की नाही, हाच प्रश्न निर्माण होतो.
त्यांचे आरोप अनेकदा बालिश पातळीवरचे असतात. “पंतप्रधान झुकतात”, “घोटाळे झाले”.पण त्याला कोणतेही ठोस पुरावे, वा जनतेचा पाठिंबा लाभत नाही. त्याच जुन्या आरोपांमधून काँग्रेसला नव्या ताकदीने उभे करता येईल, हा विश्वासदेखील आता उरलेला नाही.
अहमदाबादच्या अधिवेशनातही राहुल गांधींचे भाषण उत्साही नव्हते. त्यांनी आत्मपरीक्षण केले नाही, ना पक्षाच्या पराभवाचे मूळ कारण मांडले. ते केवळ स्वतःला ‘उपस्थित’ दाखवून जातात, पण जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाहीत.
राहुल गांधी यांचं राजकारण आजही भावनिक आरोप, जुन्या इतिहासातील संदर्भ आणि व्यक्तिनिष्ठ टीकेपुरतंच मर्यादित आहे. देशाचा तरुण वर्ग, जो नव्या विचारांच्या, नव्या नेतृत्वाच्या शोधात आहे, त्याला राहुल गांधींमध्ये ठोस पर्याय दिसत नाही. राजकारण म्हणजे केवळ पदयात्रा, ट्विटरवरून घोषणाबाजी किंवा प्रसारमाध्यमांसमोर घोषवाक्य फेकणं नाही; त्यामागे काटेकोर रणनीती, संघटन कौशल्य आणि स्पष्ट दृष्टीकोन हवा असतो. या सगळ्याचा राहुल गांधींच्या राजकीय शैलीत अभाव प्रकर्षाने जाणवतो.
काँग्रेसच्या अधिवेशनातही युवक, महिला, अल्पसंख्याक, शेतकरी, उद्योगपती यांच्याशी संबंधित ठोस कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. युवकांना रोजगार देणारी योजना, शेतकऱ्यांना हमीभावाचा कायदा, महिलांच्या सक्षमीकरणाचा रोडमॅप—या सगळ्याची उणीव राहुल गांधींच्या भाषणात ठळकपणे जाणवते. राहुल गांधी सतत “संविधान वाचवा” आणि “लोकशाही धोक्यात आहे” हेच म्हणत राहतात, पण कोणत्या योजनांनी काँग्रेस देशाचं भविष्य उज्वल करणार आहे? या प्रश्नावर ते मौन बाळगतात.
राहुल गांधी यांना आजही ‘काँग्रेस म्हणजे आमच्या घराण्याची मालकी’ असा भ्रामक विश्वास वाटतो का? ही शंका निर्माण होते. जनतेला आता भावते आत्मनिर्भर नेतृत्व, जे जबाबदारी घेतं आणि निष्काळजीपणा करत नाही. भाजपा ज्या ठिकाणी प्रबळ झाली आहे, तिथे काँग्रेसने जमीनच गमावली आहे, आणि त्याला मुख्य जबाबदार कोण असेल, तर ते राहुल गांधीच.
भविष्यात काँग्रेस पक्षाला पुनरुज्जीवित करायचं असेल, तर सर्वप्रथम राहुल गांधी यांनी जबाबदारी घेऊन पक्षाच्या अपयशाची स्पष्ट कबुली द्यावी लागेल. तात्कालिक भावना आणि गांधी घराण्याचा वारसा या दोन गोष्टींवर निवडणुका जिंकता येत नाहीत, हे त्यांना शेवटी कधी तरी स्वीकारावं लागणार आहे. नाहीतर काँग्रेसचं राजकारण हे इतिहासाच्या फोटोंपुरतं मर्यादित राहील.
अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष भविष्यकाळात कसा उभा राहणार? जनतेशी संवाद साधण्याऐवजी ते विदेशी दौऱ्यांवर जातात, कार्यकर्त्यांशी संवादाऐवजी ट्विटरवर विधाने करतात. काँग्रेस पक्षासाठी हे आत्मघातकी धोरण आहे.
आज काँग्रेस पक्ष कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचलपुरती मर्यादित राहिलाय. ज्या गुजरातमध्ये पक्षाने अधिवेशन घेतले, तिथे जवळपास सर्व जागा भाजपाच्या ताब्यात आहेत. तरीही राहुल गांधी ‘स्वप्न’ पाहतात की काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल. पण ही स्वप्ने नाही, दिवास्वप्ने आहेत.
राहुल गांधी यांचं नेतृत्व पक्षाला दिशा देत नाही, उलट दिशाहीन करत आहे. काँग्रेसच्या पुनरुत्थानासाठी, सर्वप्रथम राहुल गांधींना स्वतःकडे आणि त्यांच्या अपयशाकडे प्रामाणिकपणे पाहावं लागेल. नाहीतर पक्षाचा अंत आता फक्त वेळेचा प्रश्न राहील.
Rahul Gandhi directionlessness is exposed again from the Ahmedabad session
महत्वाच्या बातम्या