विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Attack) येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर 24 एप्रिल रोजी राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिली आणि सरकारने घेतलेल्या तात्काळ उपाययोजनांची माहिती दिली.
पहलगाम हल्ल्यात 26पर्यटकांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली होती.बैठकीत काँग्रेसचे राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डाव्या पक्षांचे नेते आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. सर्वपक्षीय बैठक दोन तास चालली. बैठकीत पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.
दहशतवादाविरोधात सरकारने घेतलेल्या कठोर भूमिकेला सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला. राहुल गांधी यांनी सरकारला पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. ओवैसी यांनी सुरुवातीला लहान पक्षांना निमंत्रण न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती, पण नंतर त्यांनाही सहभागी होण्याची संधी देण्यात आली.
बैठकीत महत्त्वाचा मुद्दा म्हणून, स्थानिक प्रशासनाने बायसरण परिसर उघडताना गुप्तचर यंत्रणांची परवानगी न घेणे ही सुरक्षा यंत्रणांतील त्रुटी म्हणून अधोरेखित करण्यात आले. यावर सर्व पक्षांनी चिंता व्यक्त केली आणि अशा चुका पुन्हा होऊ नयेत, यावर भर दिला.
सरकारने तात्काळ काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानसोबतचा 1960 सालचा सिंधू जल करार स्थगित करण्यात आला आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांना भारतात येण्यासाठी दिली जाणारी व्हिसा सेवा बंद करण्यात आली आहे आणि अटारी-वाघा सीमाद्वारे होणारी नागरिकांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. भारतातील पाकिस्तानी लष्करी सल्लागारांना परत पाठवण्यात आले असून, पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्याही कमी करण्यात आली आहे.
या सर्वपक्षीय बैठकीतून सरकार आणि विरोधकांनी एकत्रितपणे देशाच्या सुरक्षेच्या मुद्यावर एकमत व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले. हल्ल्यानंतरचा राष्ट्रीय एकोपा आणि कठोर निर्णयांची दिशा यामुळे देशातील जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पहलगाम हल्ल्यात सुरक्षेत त्रुटी असल्याचे केंद्र सरकारने गुरुवारी मान्य केले. सर्वपक्षीय बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, आयबी आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी हल्ल्याची माहिती दिली.
विरोधकांनी सांगितले की, ते सरकारसोबत आहेत. विरोधी पक्षाच्या खासदारांनी दहशतवादी छावण्या नष्ट करण्याची मागणी केली. सरकारने दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे ते म्हणाले.
सर्वपक्षीय बैठकीनंतर राहुल गांधी म्हणाले की, सरकारच्या प्रत्येक कृतीला पूर्ण पाठिंबा आहे.
All-party meeting in Delhi All-party support for government’s decisions in the wake of Pahalgam attack
महत्वाच्या बातम्या
- पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधानांवर आरोप करणाऱ्या एआययूडीएफ आमदार अमिनुल इस्लाम यांना अटक
- Muslim Organizations : पाकिस्तानला धडा शिकवा, मुस्लिम संघटनांची मागणी
- PSL Broadcast Stopped : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताचा मोठा झटका; पीएसएलचे भारतात प्रसारण थांबवले
- Michael Rubin : काश्मीर पाकिस्तानच्या गळ्याची नस असेल, तर भारताने आता त्याचा गळाच कापावा, अमेरिकन थिंक टँक सदस्य मायकेल रुबिन यांचा टोला