विशेष प्रतिनिधी
काेलकाता : Murshidabad पश्चिम बंगालमधील मुरशीदाबाद जिल्ह्यात वक्फ सुधारणा कायद्याविरोधात सुरू निदर्शनांनी शनिवारी हिंसक वळण घेतले. जाफराबाद या अतिदुर्गम भागात जमावाने हल्ला करत बाप-लेकाची निर्दय हत्या केली. तर शुक्रवारी शमशेरगंज परिसरात गोळी लागलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणात आतापर्यंत ११८ जणांना अटक करण्यात आली असून, पोलिसांकडून छापेमारी सुरूच आहे.Murshidabad
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी परिस्थितीवर भाष्य करत सांगितले की, “वक्फ सुधारणा कायदा पश्चिम बंगालमध्ये लागू केला जाणार नाही.” तसेच सर्व धर्मीयांनी शांतता राखण्याचे आवाहन करत, “मानव जीवन अमूल्य आहे. राजकारणासाठी दंगली भडकावू नका,” असे आवर्जून सांगितले.
शुक्रवारी माळदा, मुरशीदाबाद, दक्षिण २४ परगणा आणि हुगळी जिल्ह्यांत कायद्याविरोधात झालेल्या निदर्शनांतून मोठ्या प्रमाणावर हिंसा उसळली. पोलिसांच्या गाड्या जाळल्या गेल्या, सुरक्षा यंत्रणांवर दगडफेक झाली आणि रस्ते रोखले गेले. शुक्रवारी झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी स्पष्ट केले की हा गोळीबार त्यांच्याकडून झाला नसावा. BSF च्या जवानांकडून गोळी सुटल्याचा अंदाज आहे, कारण केंद्र सरकारने या भागात केंद्रीय सुरक्षा दल तैनात केले होते.
या हिंसाचारावरून भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी या आंदोलनाला “जिहादी शक्तींनी घडवलेला पूर्वनियोजित हिंसाचार आणि लोकशाहीवरील आघात” असे संबोधले. त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून केंद्रिय सुरक्षा दलांची मागणी केली होती.
त्याचवेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार यांनी आरोप केला की, सरकारने हिंसाचारग्रस्त भागात इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे पीडितांचे आवाज दबले जात आहे. याचबरोबर या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) देण्याची मागणीही भाजपाने केली आहे.
दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी भाजपावर “सर्व राज्यांमध्ये सांप्रदायिकतेची आग पेटवण्याचा प्रयत्न” करत असल्याचा आरोप केला. “रात्रीच्या वेळी संसदेत हा कायदा पारित केला गेला, ही भाजप-आरएसएस यांची नेहमीची खेळी आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
राज्य पोलीस आणि BSF एकत्रितपणे हिंसाचारग्रस्त भागांत तैनात असून, जंगीपूर परिसरात विशेष लक्ष दिले जात आहे. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक जावेद शमीम यांनी जनतेला अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत, शांतता राखण्याची विनंती केली आहे.
Protests against Waqf Amendment Act: Violence in Murshidabad, brutal murder of father and daughter
महत्वाच्या बातम्या