विशेष प्रतिनिधी
चेन्नई: Ponmudi तमिळनाडूचे उच्चशिक्षण व वनमंत्री आणि डीएमकेचे ज्येष्ठ नेते के. पोनमुडी यांनी हिंदू धर्मातील शैव-वैष्णव परंपरा आणि महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा राजकीय व सामाजिक वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे भावनांना ठेच पोहोचल्याचे सांगत अनेक हिंदू संघटनांनी तसेच राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला असून, त्यांच्या मंत्रिपदावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.Ponmudi
पोनमुडी यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना शैव आणि वैष्णव परंपरेतील अनुयायांची तुलना अश्लील आणि अपमानास्पद उपमांनी केली. विशेषतः शैव अनुयायांच्या भाळी लावल्या जाणाऱ्या त्रिपुंड आणि वैष्णवांच्या ललाटावरील नामधारणाबाबत त्यांनी अश्लील स्वरूपाचे विधान केले. शैव परंपरेतील तीन रेघा आणि वैष्णवांची उर्ध्वरेषा ‘पुरुष आणि स्त्री लैंगिक अवयवांचे प्रतीक’ असल्याचे त्यांना वाटते. त्यांनी या चिन्हांचा संदर्भ महिलांच्या शरीराशी जोडून अतिशय अशोभनीय टिप्पणी केली. हे विधान सार्वजनिक मंचावर करताच उपस्थितांमध्ये खळबळ उडाली आणि संतापही व्यक्त झाला.
या विधानावरून डीएमकेमध्येच संतापाची लाट उसळली. खासदार कनिमोळी यांनी स्वतः पुढे येऊन पोनमुडी यांच्या विधानाचा निषेध केला आणि ते निषेधार्ह असल्याचे सांगितले. यानंतर पक्षाने तात्काळ निर्णय घेत पोनमुडी यांना डीएमकेच्या उपमहासचिव पदावरून हटवले, मात्र त्यांच्या मंत्रिपदावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
विरोधी पक्ष भाजपने या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली असून, राज्य भाजप अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “धर्म आणि महिलांविषयी अपमानास्पद बोलणाऱ्या मंत्र्याला सत्ता ठेवण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.” त्यांनी मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्यावर दबाव टाकत पोनमुडी यांची त्वरित हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनीसुद्धा या प्रकरणात उडी घेतली असून, “सार्वजनिक जीवनातील नेत्यांनी जबाबदारीने वागावे, धर्म आणि महिलांविषयी अपमानास्पद भाषा वापरणे हे अत्यंत निंदनीय आहे. अशा वक्तव्यांची समाजाने सहनशीलता दाखवणे धोकादायक ठरू शकते,” असे सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
वाद वाढताच पोनमुडी यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर माफी मागितली. “माझ्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या असतील. माझा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो,” असे त्यांनी सांगितले. मात्र, विरोधक आणि जनतेचा रोष पाहता, केवळ माफी पुरेशी नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
या साऱ्या प्रकरणावर मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पक्षाच्या अंतर्गत हालचालीतूनच निर्णय घेतला गेला असला, तरी त्यांच्या मौनामुळे प्रश्न निर्माण होतो की, डीएमके अशा वक्तव्यांना पाठीशी घालते आहे का?
Tamil Nadu Minister Ponmudi’s controversial statement, removed from the post of Deputy General Secretary, but retains the ministerial post
महत्वाच्या बातम्या