विशेष प्रतिनिधी
पुणे: एसटीला फायद्यात आणण्यासाठी महामंडळाची विविध शहरांमध्ये मोक्याच्या जागा खासगी विकासकांना 60 वर्षांच्या करारावर देण्याचा सरकारचा विचार आहे. त्यातून निधी उभा केला जाईल, असा तोडगा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुचवला आहे.मार्चचा उर्वरित पगार लवकरात लवकर होण्यासाटी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी अजित पवार पुण्यातील फुले वाडा येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना विविध प्रश्नांवर उत्तरे दिली. एसटी कर्मचाऱ्यांचा मार्चचा पगार 56% झाला आहे. एसटी महामंडळ तोट्यात असल्याचे सांगत अजित पवार म्हणाले की एसटीला कोरोना काळात मोठा आर्थिक फटका बसला होता. तेव्हा दर महिन्याला 250-300 कोटी रुपये राज्य सरकारने दिले आणि एसटी चालवली आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक अशा अनेक घटकांना एसटीची सवलत मिळते. यामुळे एसटीला तोटा होऊ नये यासाठी बजेटमध्येही त्याची तरतूद करुन दिली जाते.
एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगारावर त्या खात्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनाही सांगितले आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जगात सार्वजिनिक वाहतूक व्यवस्था या कुठेही फायद्यात नसते. लोकांना किफायतशिर दरात वाहतूक व्यवस्था देणे ही सरकारची जबाबदारी आहे. एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी एसटीच्या मोक्याच्या जागा खासगी विकासकांना बीओटी तत्वावर देऊन उत्पन्न वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. यासंबंधीच्या धोरणावर मंत्रिमंडळातही चर्चा झाली आहे. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत बीओटीचा प्रस्ताव आणला जाणार आहे.
अजित पवार म्हणाले की, सुरुवातीला 30 वर्षांसाठी एसटीच्या जागा बीओटी तत्त्वावर देण्याचा विचार होता. मात्र त्यासाठी विकासक तयार नाहीत, त्यामुळे आता 60 वर्षांसाठी जागा विकासकांना देण्याचा विचार आहे. त्यानंतर 30 वर्षांसाठी करार वाढवून देण्यात येईल, असा प्रस्ताव आहे. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणावर विचार केला जाणार आहे.
Ajit Pawar’s solution to bring ST in benefit, ST strategic sites to private developers on BOT basis
महत्वाच्या बातम्या