विशेष प्रतिनिधी
Pune News: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) अनामत रक्कम भरता न आल्याने एका महिलेला उपचार नाकारण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. दुसऱ्या रुग्णालयात नेल्यानंतर त्या महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला, मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पुण्यात संतापाची लाट उसळली असून विविध राजकीय पक्षांनी रुग्णालयाच्या विरोधात आंदोलन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेला “असंवेदनशील” असे संबोधून चौकशीसाठी समिती नेमली आहे. असंवेदनशीलतेचा अंत करण्याचे ठरविले असून इमर्जन्सी मध्ये अनामत रक्कम घेणार नाही असा विश्वस्त व मॅनेजमेंट या सर्वांनी ठराव केला असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी म्हटले आहे
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अनामत रक्कम भरता न आल्याने एका महिलेला उपचार नाकारण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात दाखल केल्यावर जुळ्या मुलांना जन्म देऊन तिचा मृत्यू झाला. यामुळे पुण्यात संताप व्यक्त होत आहे. अनेक राजकीय पक्षांनी रुग्णालयाच्या विरोधात आंदोलने केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी असंवेदनशील असे म्हणून रुग्णालयाच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे. यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी एक निवेदन दिले आहे. आम्ही असंवेदनशीलतेचा अंत करण्याचे ठरविले असून इमर्जन्सी मध्ये अनामत रक्कम घेणार नाही असा विश्वस्त व मॅनेजमेंट या सर्वांनी ठराव केला असल्याचे म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी अधिकृत निवेदन जाहीर केले आहे. “दीनानाथ रुग्णालय हे आदर्शवादी मूल्यांवर उभे राहिले आहे. आजवर सचोटी, पारदर्शकता, गरजूंची सेवा व कमिशन प्रॅक्टिसपासून दूर राहणे ही आमची बांधिलकी राहिली आहे,” असे त्यांनी नमूद केले.
घटनेच्या पार्श्वभूमीवर आत्मपरीक्षण करत, रुग्णालयाच्या विश्वस्त आणि व्यवस्थापन समितीने एक मोठा निर्णय घेतला आहे. “आजपासून दीनानाथ रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात (Emergency) कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम (डिपॉझिट) घेतली जाणार नाही,” असा ठराव केला असून त्याची अंमलबजावणी तात्काळ सुरू करण्यात येणार आहे.
डॉ. केळकर यांनी स्पष्ट केले की, “या घटनेत रुग्णालयाने असंवेदनशीलता दाखवली का याची आम्ही सखोल चौकशी करत आहोत. संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना शक्य ती मदत करण्याचा प्रस्ताव दिला होता. तरीही ते कोणालाही न सांगता निघून गेले.”
“आमच्या आदर्शवादाला आणि संवेदनशीलतेला धक्का बसू नये म्हणून आम्ही ही भूमिका घेत आहोत. ही घटना अत्यंत वेदनादायक असून, समाजाच्या मनात निर्माण झालेल्या भावनांचा आम्ही आदर करतो,” असेही त्यांनी सांगितले.
डॉ. केळकर यांनी म्हटले आहे की, 2001 साली दीनानाथ रुग्णालयाची सुरुवात झाली. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रेरणेने व आदर्शवादाच्या उद्देशाने हे रुग्णालय सुरू झाले. हे रुग्णालय इतरांपेक्षा वेगळे आहे कारण यामध्ये सचोटी, कमिशन प्रैक्टिसला अजिबात थारा न देणे, फार्मा इंडस्ट्री कडून कोणतेही पैसे व स्पॉन्सरशिप न घेणे, पेशंट कडून नियंत्रित दरामध्ये व शिस्तीमध्येच सर्व व्यवहार करणे, जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणे, पारदर्शकता व आलेल्या सर्व गरीब व गरजू रुग्णांची मदत करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर सतत जागती ठेवून वाटचाल करण्यात आली. दिवसेंदिवस दीनानाथ रुग्णालयाची प्रगती वाढतच गेली व आजमितिला ८५००० आंतररुग्ण दरवर्षी, पाच लाख बाह्य रुग्ण आणि तीस हजार मोठ्या शस्त्रक्रिया रुग्णालय रुग्णांच्या विश्वासावरच करीत आहे. यामध्ये गरीब रुग्णांना रोज दहा रुपयांमध्ये कुठल्याही विभागाचा केस पेपर, रोज ५० टक्के सवलतीत सर्व तपासण्या व दारिद्य रेषेखालील रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया या केल्या जातात आणि त्याची दर महिन्याला charity कमिशनरला पूर्ण यादी पुरवली जाते. स्वाईन फ्लू कोविड व आताच होऊन गेलेला जीबीएस वा गियाबारी सिंड्रोम या सर्व सार्थीच्या आजारात रुग्णालयाने अतिशय निस्पृहपणे विलक्षण काम केले.
कालचा दिवस दीनानाथच्या इतिहासातील अत्यंत काळा व सुन्न करणारा होता. आजपर्यंत केलेल्या कामाची कोणतीही जाणीव न ठेवता, रागावलेल्या मोर्चातील एका समूहाने पब्लिक रिलेशन ऑफिसर्सच्या अंगावर चिल्लर फेकली, महिला कार्यकर्त्यांनी जाऊन डॉक्टर घैसास यांच्या आई वडिलांच्या हॉस्पिटलवर हल्ला केला व तोडफोड केली, एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर या नावाला काळे फासले व या सर्व गोष्टी जबाबदारपणे टेलिव्हिजन कॅमेऱ्यासमोरच घडल्या. हे सर्व बघून आमची मान शरमेने खाली गेली व लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देवच जाणे, असेही त्यांनी म्हटले आहे.
हेचि काय फळ मम तपाला, इथपासून ते या समाजात चांगले काम करूच नये अशा प्रकारचे सर्व विचार व सल्ले मिळू लागले. या सर्व गोष्टींनी उद्विग्न होऊन विश्वस्त मंडळाची काल छोटी बैठक झाली व त्यात या विषयावर सखोल चर्चा झाली. लोकं कशा पद्धतीने चुकीचे वागत आहेत किंवा या विषयाला राजकीय रंग कसा येत चालला आहे हे सोडून देऊन, आपले काय चुकत आहे यावर आत्मचिंतन करण्यात आले.
हा सर्व विचार करीत असताना एक शब्द आमच्या सर्वांच्या मनात काळोख्या रात्रीतल्या विजेसारखा चमकून गेला -‘असंवेदनशीलता’ अर्थात व्यवहाराच्या चौकटीमध्ये आदर्शवादाचा किंवा संवेदनशीलतेचा कोंडमारा, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
झालेल्या दुर्दैवी घटनेमागे व मृत्यू मागे दीनानाथ रुग्णालयाचा संबंध जोडणे जरी चुकीचे चालले असले तरी रुग्णालयाकडून रुग्णाप्रति संवेदनशीलता दाखवली गेली की नाही हे आम्ही तपासत आहोत. सदर महिलेच्या नातेवाईकांना मी स्वतः त्यांना तुम्हाला जमेल तेवढी रक्कम भरा बाकी आम्ही सर्व मदत करू असे सांगितलेले असतानाही कोणालाही न कळवता ते निघून गेले, असा खुलासाही त्यांनी केला आहे.
जेव्हा दीनानाथ सुरू झाले तेव्हा कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम (डिपॉझिट) घेतली जात नसे परंतु जसे जसे उपचार व शस्त्रक्रिया व रुग्णालयाचे नाव वाढत गेल्यामुळे येणारे गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेले तसे तसे जास्त महागडे उपचार गरजेचे असल्यास अनामत रक्कम घेण्यास कुठेतरी सुरुवात झाली. कालच्या उद्विग्न करणाऱ्या घटनेने आम्ही या विषयाचा पुन्हा आढावा घेतला व यापुढे दिनानाथ रुग्णालय इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंट कडून मग तो इमर्जन्सी रूम मध्ये आलेला असो वा डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटला आलो असो वा लहान मुलांच्या विभागाला आलेला असो त्यांच्याकडून इमर्जन्सी मध्ये अनामत रक्कम घेणार नाही असा विश्वस्त व मॅनेजमेंट या सर्वांनी ठराव केला व आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. या असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करीत आहोत याची सर्व बंधू-भगिनींनी व माननीय मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
Deenanath Mangeshkar Hospital’s decision not to take deposit in emergencies
महत्वाच्या बातम्या
- Chief Minister : वैदिक गणितावर आधारित गुणवत्ता केंद्र सुरू करणार , मुख्यमंत्र्यांची माहिती
- Maharashtra भाऊसाहेबांकडचे हेलपाटे वाचले, महाराष्ट्रातील शेतकरी हायटेक झाले, शासनाला ७६ कोटी ८० लाख
- Ashish Shelar लागली बत्ती पार्श्वभागाला की.. आशिष शेलार यांच्यावर टीकेवरून संदीप देशपांडे यांना इशारा
- Kunal Kamra मुंबईत येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू…राहुल कनाल यांचा कुणाल कामराला इशारा