विशेष प्रतिनिधी
जयसिंगपूर : राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर साखरेचे दर प्रतिक्विंटल ३१०० रूपयापर्यंत खाली येवू लागले आहेत. ऊस उत्पादक शेतकरी व ग्राहकांना याचा मोठा फटका बसू लागला आहे. सध्या बाजारात साखरेचा दर हा प्रतिक्विंटल ४ हजार रूपयापर्यंत आहे. यामुळे केंद्र सरकारच्या सहकार विभाग व अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाने तातडीने चौकशी करून संबधित साखर कारखाने व व्यापारी यांचेवर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा व केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली.
महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक सीमाभागातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर साखर कारखान्यांचा साखर विक्रीचा दर ३१०० रूपयापर्यंत खाली आलेला आहे. सध्या बाजारात व्यापारी प्रतिकिलो ३७ रूपयांनी दुकानदारांना साखरेची विक्री करत असून दुकानदाराकडून ग्राहकांना प्रतिकिले ४० रूपयांनी साखर विकली जात आहे.कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील काही खासगी व सहकारी साखर कारखानदारांचे नातेवाईकच साखरेचे व्यापारी आहेत.साखर कारखान्यांकडून कमी दराने विकलेली साखर बाजारात येत नसून ती साखर संबधित साखर कारखान्यांच्या गोडावूनमध्येच ठेवण्यात येत आहे.
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची होणार कठोर पडताळणी
विशेष करून मराठवाडा, विदर्भ व कर्नाटक मधील ज्या साखर कारखान्यांची रिकव्हरी कमी आहे व आर्थिक अडचणीत आहेत असे कारखाने कमी दराने साखर विक्री करू लागले आहेत. गेल्या महिन्याभरामध्ये ज्या साखर कारखान्यांनी साखर विक्री केली आहे ती किती दराने विकली व ज्या व्यापा-यांनी ती साखर खरेदी केली आहे ती साखर कोणत्या बाजारात किती दराने विक्री केली आहे याची सखोल चौकशी केल्यास यामधील बिंग फुटणार आहे. काही साखर कारखानदार व साखरेची मोठे व्यापारी मिळून शेतकरी व ग्राहकांना लुबाडत असून या साखर विक्रीची सखोल चौकशी संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.