विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार संग्राम जगताप यांनी महापालिकेच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल करत नगररचना विभागातील अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्याचा इशारा दिला आहे. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा, निष्क्रियता आणि अतिक्रमणांना मिळणाऱ्या कथित संरक्षणामुळे शहरातील विकासकामे रखडली असून नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत असल्याचा आरोप त्यांनी केला.
जगताप यांनी सांगितले की, शहरातील विकास आराखड्यातील रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणण्यात आला. मात्र महापालिकेच्या नगररचना आणि अतिक्रमण विभागाच्या निष्काळजीपणामुळे अनेक कामे प्रलंबित आहेत, तर काही कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. आवश्यक रेखांकन वेळेत दिले जात नसल्याने आणि अतिक्रमणे हटवली जात नसल्याने विकासकामे अडकत आहेत.
त्यांनी आरोप केला की, काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या कारभारामुळे ठेकेदारांना कामे पूर्ण करता येत नाहीत. अनेक ठिकाणी कामे सुरू झाल्यानंतर अचानक थांबवली जातात. याचा फटका व्यापारी, नागरिक आणि वाहतूक व्यवस्थेला बसत आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार जगताप यांनी शहरातील ओढे आणि नाले बुजवण्याच्या प्रकारावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. काही अधिकाऱ्यांच्या अप्रत्यक्ष संरक्षणामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे फावले असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे नैसर्गिक जलमार्ग अरुंद होत असून पावसाळ्यात नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना वाढत आहेत. अशा प्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“स्वतःची जबाबदारी झटकून एकमेकांवर दोषारोप करण्याचे काम काही अधिकारी करत आहेत. नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
एकविरा चौक ते तपोवन रस्ता प्रकल्पाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. मूळ विकास आराखड्यानुसार हा रस्ता २४ मीटर रुंदीचा असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात तो केवळ १५ ते १७ मीटर रुंदीचाच होत असल्याचे त्यांनी नमूद केले. महापालिकेची मालकी हद्द नेमकी कुठपर्यंत आहे हे प्रथम स्पष्ट करावे आणि त्यानंतरच विकासकामे हाती घ्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.
महापालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांनी संथ गतीने सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही आमदार संग्राम जगताप यांनी दिला.
MLA Sangram Jagtap Demands Criminal Cases Against Civic Officials Over Development Delays and Encroachment Failures
महत्वाच्या बातम्या