विशेष प्रतिनिधी
इस्लामपूर : Raju Shetty शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी तीव्र भूमिका घेतली आहे. “विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचा बळी दिला जाणार असेल, तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही,” असा इशारा त्यांनी इस्लामपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. Raju Shetty
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, माजी पंचायत समिती सदस्य संदीप राजोबा, राज्य प्रवक्ते भागवत जाधव आदी उपस्थित होते.
महामार्गामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
खा. शेट्टी म्हणाले, “शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांचे काहीही भले होणार नाही, मात्र काही नेत्यांचे हात मात्र ओले होणार आहेत. या महामार्गासाठी टाकण्यात येणाऱ्या भरावामुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या शेतकऱ्यांना पुराचा मोठा धोका आहे. त्यामुळे हा शेतकरीविरोधी महामार्ग आम्ही होऊ देणार नाही.”
५०,००० कोटी रुपयांचा घोटाळा?
शेट्टी यांनी या महामार्गाच्या खर्चावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “८०२ किमी लांबीच्या या महामार्गासाठी सरकार ८६,००० कोटी रुपये खर्च करणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एका किलोमीटरचा रस्ता ३० ते ३५ कोटी रुपयांत बांधत असताना, शक्तिपीठ महामार्गासाठी प्रति किलोमीटर १०८ कोटी रुपये खर्च कसा होतोय?” असा सवाल त्यांनी केला.
“हा रस्ता मुळात ३५,००० कोटी रुपयांमध्ये पूर्ण व्हायला हवा होता, मात्र त्यासाठी ८६,००० कोटी रुपये खर्च होणार आहेत. म्हणजे तब्बल ५०,००० कोटी रुपयांचा घोटाळा काही राजकारणी करणार आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल हा भ्रम
राजू शेट्टी यांनी समृद्धी महामार्गाच्या उदाहरणाद्वारे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यावरही भाष्य केले. “समृद्धी महामार्गासाठी जमिनी घेताना शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला मिळाला. मात्र, त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने जमीन अधिग्रहण कायदा बदलला आणि नवीन कायद्यानुसार बाजारभावाच्या केवळ दुप्पटच रक्कम मिळणार आहे.”
“जर समृद्धी महामार्गात एका शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा १०० रुपये मोबदला मिळाला असेल, तर शक्तिपीठ महामार्गासाठी केवळ ४० रुपये मिळणार आहेत,” असा इशारा त्यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय जमीन अधिग्रहण
शेट्टी यांनी नवीन कायद्यावरही टीका केली. “२०१३ च्या मूळ कायद्यानुसार शेतकऱ्यांची जमीन त्यांची संमतीशिवाय अधिग्रहित करता येत नव्हती. मात्र, नव्या कायद्यानुसार सरकार शेतकऱ्यांची जमीन त्यांच्या परवानगीशिवाय घेऊ शकते,” असे ते म्हणाले.
“हा महामार्ग म्हणजे सत्ताधाऱ्यांसाठी मलई खाण्याचा मार्ग आहे. काहीही करून आम्ही हा रस्ता होऊ देणार नाही,” असा ठाम निर्धार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.
Not a handful but a whole bunch of people are opposing the Shaktipeeth highway, alleges Raju Shetty
महत्वाच्या बातम्या
- Anjali Damania : हे सर्व जण तुमच्याच तालमीत तयार, तुम्हीच मोठे केलेत, अंजली दमानिया यांनी शरद पवारांना सुनावले
- Harshvardhan Sapkal सत्ताधारी पक्षातील लोकांकडून दहशत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
- Devendra Fadanvis : बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्ताराचा निर्णय!