विशेष प्रतिनिधी
पुणे : महात्मा फुलेंना केवळ ब्राह्मणांनीच नाही तर आमच्याही लोकांनी विरोध केला. ब्राह्मण समाजाच्या अनेक लोकांनी त्यांना मोलाची मदत केली. त्यामुळे सिनेमाला विरोध करण्यापेक्षा तेव्हाचा इतिहास समजून घ्या. फुले चित्रपट लवकर प्रदर्शित होऊ द्या. महात्मा फुले व सावित्रीबाईंचे काम जगभरात जाऊ द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी शुक्रवारी फुले चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना केले.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महात्मा ज्योतिबा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती यांच्यातर्फे महात्मा फुले समग्र वाड्मय या पुनर्मुद्रित ग्रंथाचा वितरण समारंभ आणि महात्मा फुले जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते.
भुजबळ म्हणाले, फुले चित्रपटाला काही लोक विरोध करत आहेत. चित्रपट बनवणारे लोक आम्ही जे सत्य आहे तेच मांडल्याचा दावा करत आहेत. माझी सर्वांना विनंती आहे. त्यावेळी जी परिस्थिती होती, तशी आज नाही. आज सर्वकाही बदलले आहे. सिनेमाला विरोध करण्यापेक्षा त्यावेळचा इतिहास समजून घ्या. सिनेमाला विरोध करू नका. हा चित्रपट लवकर प्रदर्शित होऊ द्या. महात्मा फुले व सावित्रीबाईंचे काम जगभरात जाऊ द्या.
भुजबळ म्हणाले, . त्यावेळच्या मागासांना आपण प्यायला पाणी देत नव्हतो, तेव्हा महात्मा फुलेंनी ही विहीर सर्वांसाठी खुली केली. ते त्यांच्यासोबत जेवले. सर्व महिलांना आधार दिला. सर्वांना सांभाळले. त्यांनी गरोदर महिलांनाही आधार दिला. त्यावेळी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात पोस्टर्स लावून म्हटले होते की, गरोदर महिलांनी आत्महत्या करू नये. आम्ही तुमचे आई-वडील आहोत. आमच्याकडे या. आम्ही तुमचे बाळंतपण करतो. आजही जे शक्य नाही, ते त्यांनी तेव्हा केले होते.
भिडे वाड्याला फार मोठा इतिहास आहे. क्रांतीचे पाणी येथूनच पेटले होते. जगातील पहिली क्रांती या वाड्यातून झाली. आपण हा इतिहास विसरत आहोत हे दुर्दैव आहे. केवळ ब्राह्मणच नव्हे तर आमच्यातीलही अनेकांनी फुलेंना विरोध केला होता. तर अनेक ब्राह्मणांनी त्यांना मदतही केली होती. अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की, इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे. इतिहास ज्ञात असल्याशिवाय तुम्ही भविष्य घडवू शकत नाही. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा लढा ब्राह्मणांच्या विरोधात नव्हता. अंधश्रद्धेच्या व ब्राह्मणवादाच्या विरोधात होता, असे भुजबळ यांनी सांगितले.
Not only Brahmins but also our people opposed Mahatma Phule, Chhagan Bhujbal Pathimba support for the film Phule
महत्वाच्या बातम्या