विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या विकासासाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले असतील आणि शरद पवार यांच्या अनुभवाचा काही फायदा होत असेल तर, या दोघांच्या एकत्रित येण्यावर मला काही गैर वाटत नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. Praful Patel
माजी केंद्रीय मंत्री असलेले प्रफुल्ल पटेल हे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. पवारांचे दिल्लीचे राजकारण तेच सांभाळत असेही म्हटले जात होते. पक्षात पेचप्रसंग निर्माण झाल्यावर पटेल संकटमोचकाची भूमिका निभावत. अजित पवार यांनी शरद पवारांशी फारकत घेण्याचा निर्णय घेतल्यावर प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांची साथ दिली. यामुळे तेव्हा आश्चर्य व्यक्त केले जात होते.
आता पटेल यांच्या वक्तव्यामुळे पडद्यामागे पुन्हा घडामोडी घडू लागल्या आहेत का अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार ही काका-पुतण्याची जोडी पुन्हा एकत्र येईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 10 एप्रिल रोजी अजित पवार यांचे धाटके चिंरजीव जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने अजित पवारांनी त्यांचे काका म्हणजेच शरद पवार यांच्या स्वागतासाठी गेटपर्यंत गेल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर दोन दिवसांनी रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार हे एकमेकांच्या बाजूला बसले होते.
यासंदर्भात प्रफुल पटेल म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासासाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले असतील आणि शरद पवार यांच्या अनुभवाचा काही फायदा होत असेल तर, या दोघांच्या एकत्रित येण्यावर मला काही गैर वाटत नाही. रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्राची एक मोठी शिक्षण संस्था आहे. लाखो विद्यार्थी या शिक्षण संस्थेत शिकत आहेत. महत्त्वाचे म्हणजे अजित पवार हे या संस्थेचे विश्वस्त आहेत, तर शरद पवार हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे शिक्षण संस्थेच्या कार्यकारणीच्या बैठकीत दोन्ही नेते जर एकत्र आलेत तर, त्यात आश्चर्याची गोष्ट नाही. महाराष्ट्र आणि बारामतीच्या विकासासाठी जर शरद पवारांसारख्या अनुभवी नेत्यांशी काही संवाद झाला तर, त्यात काही चुकीचं नाही. दोघांचे दोन वेगळे पक्ष आहेत, पण महाराष्ट्राच्या विकासासाठी जर दोन्ही नेते एकत्र येत असतील तर त्यात काही चुकीचं नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात अमित शहांची भेट घेऊन शिवसेनेतील आमदारांना निधीसाठी दुजाभाव होत असल्याची तक्रार केल्याची चर्चा सध्या होताना पाहायला मिळत आहे. यासंदर्भात प्रफुल पटेल म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी अमित शहांकडे कोणतीही खंत किंवा तक्रार केलेली नाही. कार्यक्रम संपल्यानंतर अमित शहा, देवेंद्र फडणवीस, अजित दादा, एकनाथ शिंदे आणि मी स्वत: सुनील तटकरेंकडे जेवणासाठी एकत्र होतो. तेव्हा तिथे कोणत्याही विषयावर चर्चा झालेली नाही. खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही तिथे सगळे भेटलो आणि जेवण केलं. महाराष्ट्रात आमची महायुती भक्कमपणे कशी चालवायची याबद्दल आम्ही सर्वांनी शुभचिंतन केले.
Praful Patel statement sparks political debate
महत्वाच्या बातम्या