विशेष प्रतिनिधी
बीड : दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी आपली जमीन लाटली, असा आरोप केला होता. यावरून राजकीय गदारोळ उठला आहे. आता ही जमीन खरेदी करणारे परळी येथील व्यापारी गोविंद मुंडे पुढे आले आहेत. सारंगी महाजन यांच्या जमिनीचा व्यवहार दोन वर्षांपूर्वी त्यांच्या संमतीने आणि रजिस्ट्री ऑफिसमध्ये झालेला आहे असे मुंडे म्हणाले आहेत.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे संबंध पुढे आले. त्यानंतर सारंगी महाजन यांनीही आरोप केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, माझी जमीन धनंजय आणि त्याच्या माणसांनी हडप केली आहे. गोविंद मुंडे हा त्यांच्या घरचा नोकर आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला धाक दाखवून त्याने माझी जमीन हडप केली. कोऱ्या कागदांवर, १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर सह्या घेतल्या आणि त्या देत नाही तोपर्यंत परळी सोडू देणार नाही, असा धाक दाखवला. त्यामुळे आम्ही विचार केला की एवढं जमिनीत काय? की आमची जमीन हडप केली.
साडेतीन कोटींपेक्षा जास्त किंमत असलेली जमीन २१ लाख रुपयांना दिली. त्याचे पैसे आल्यानंतर मला समजलं की हा सगळा घोटाळा आहे. माझी जमीन मला दाखवलीच नाही. १५ दिवसांनी जेव्हा मी पाहिलं तेव्हा त्याचा सातबारा बदलून टाकला होता. जो नियमाने १५ दिवसांनी बदलतो. सात बारा कागदावर इतर नावंही चढवली होती. ज्यांना जमीन विकली ते लोकही मला ठाऊक नव्हते असा आरोपही सारंगी महाजन यांनी केला होता.
यावर गोविंद मुंडे म्हणाले,सारंगी महाजन यांच्या जमीन खरेदीचा व्यवहार हा पूर्णपणे त्यांच्या संमतीने झालेला आहे. खरेदीखत रजिस्ट्री ही रजिस्ट्री ऑफिसमध्ये झालेली आहे. त्यांना व्यवहारात ठरलेली संपूर्ण रक्कम देखील दिलेली आहे. सारंगी या सुशिक्षित असून कुठल्याही कोऱ्या कागदावर सह्या कशा करू शकतात? त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे व चुकीचे आहेत.
संबंधित व्यवहाराचे पूर्ण रेकॉर्ड माझ्याकडे तसेच रजिस्ट्री कार्यालयात देखील उपलब्ध आहे. हा व्यवहार सारंगी व माझ्यात झालेला असून या प्रकरणाचा मंत्री धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांचा दुरान्वये कसलाही संबंध नाही, असेही गोविंद मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
Praveen Mahajan’s wife makes serious allegations – Munde brothers and sisters grabbed our land
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली