विशेष प्रतिनिधी
पुणे : तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या तपासात महत्त्वाचा टप्पा पार पडला असून, ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने दिलेल्या प्राथमिक अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (Deenanath Mangeshkar Hospital) आणि डॉ. अमोल घैसास यांच्यावर थेट कोणताही ठपका ठेवलेला नाही. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला या प्रकरणात तात्पुरता दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. हा सहा पानी अहवाल पुणे पोलिसांकडे सादर करण्यात आला आहे.
वैद्यकीय समितीने रुग्णालयात तनिषावर करण्यात आलेल्या उपचार प्रक्रियेबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. समितीच्या निरीक्षणानुसार, उपचारात कोणतेही स्पष्ट वैद्यकीय दुर्लक्ष झाल्याचे पुरावे सापडलेले नाहीत. तसेच, दिलेल्या उपचार पद्धती वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
तथापि, पुणे पोलिसांनी या अहवालातील चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर ससून रुग्णालयाकडून पुन्हा सविस्तर स्पष्टीकरण मागवले आहे. यात उपचाराच्या वेळेची अचूक नोंद, इमर्जन्सी प्रतिसाद वेळ, ICU व्यवस्था आणि रुग्णाच्या प्रकृतीबाबत वेळोवेळी घेतलेले निर्णय यांचा समावेश आहे. अंतिम निर्णय ससून रुग्णालयाकडून येणाऱ्या दुसऱ्या अभिप्रायावर अवलंबून राहणार आहे.
या प्रकरणात सुरुवातीपासूनच तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. विशेषतः तनिषाच्या नणंदेने माध्यमांसमोर उपचार प्रक्रियेतील त्रुटी, विलंब आणि माहितीच्या अभावाबाबत चिंता व्यक्त केली होती. ही माहिती पुणे पोलिसांनाही पुरवण्यात आली होती.
यानंतर भिसे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रम मांडला. त्यांनी राज्य सरकारकडे विनंती केली की भविष्यात अशा प्रकारचे वैद्यकीय दुर्लक्ष होऊ नये यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणि जबाबदारी निश्चित करणारी व्यवस्था तयार करण्यात यावी.
“आमचा रोष केवळ एका डॉक्टरवर नाही, तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर आहे,” असे भावनिक वक्तव्य तनिषाच्या कुटुंबीयांनी केले. “आमच्या मुलीचे आयुष्य गेले, आता दुसऱ्या कोणाचं आयुष्य अशा गोंधळामुळे जाऊ नये, हीच आमची मागणी आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हा प्रकरण केवळ वैद्यकीय दुर्लक्षापुरता मर्यादित न राहता, रुग्णालयीन जबाबदाऱ्या, इमर्जन्सी प्रतिसाद वेळ, कुटुंबियांना दिलेली माहिती यासारख्या अनेक स्तरांवर प्रश्न उपस्थित करत आहे. सध्या पोलिस तपास सुरु असून, ससून रुग्णालयाकडून मिळणाऱ्या अंतिम अभिप्रायानंतर पुढील कारवाई निश्चित केली जाणार आहे.
Temporary relief to Deenanath Mangeshkar Hospital in Tanisha Bhise case; Sassoon Committee report finds no evidence of negligence, but investigation still ongoing
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : खुर्ची बदलली असली तरी विकासाचे विमान आणि इंजिनही तेच , एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
- Mahagyandeep : देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
- Kalakendra Artists : तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती, आशिष शेलार यांची माहिती
- NCW अध्यक्षा विजयाताई रहाटकर उद्यापासून हिंसाचारग्रस्त बंगाल दौऱ्यावर; मुर्शिदाबाद, मालद्यात जाऊन देणार पीडित कुटुंबीयांना आधार!!