विशेष प्रतिनिधी
मुंबई : वक्फ सुधारणा विधेयकावरून घेतलेल्या भूमिकेवरून उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेची चांगलीच गोची झाली आहे. नक्की काय भूमिका घ्यावी हे त्यांना सुचेनासे झाले आहे. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. काय बोलायचं काय निर्णय घ्यायचा, हे उबाठा नेतृत्वाला सुचत नाहीये अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन वक्फ दुरुस्ती विधेयकावरून मोदी सरकारवर टीका केली. आमचा विरोध भाजपाच्या ढोंगीपणाला आहे. वक्फ विधेयक आणि हिंदुत्त्वाचा संबंध नाही, असे स्पष्टीकरण ठाकरे यांनी दिले. त्यांच्या याच भूमिकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदे म्हणाले, वक्फ बिलाला विरोध नसून आमचा भाजपाच्या ढोंगीपणाला विरोध आहे, असं ते म्हणत आहेत. ते अतिशय गोंधळलेल्या स्थितीत आहेत. काय बोलायचं काय निर्णय घ्यायचा, हे उबाठा नेतृत्वाला सुचत नाहीये. कालचा दिवस (3 एप्रिल) खऱ्या अर्थाने उबाठासाठी दुर्दैवी होता. ते म्हणतात की वक्फ बोर्ड विधेयक आणि हिंदुत्त्वाचा काहीही संबंध नाही. आमचा वक्फ बिलाला विरोध नसून आमचा भाजपाच्या ढोंगीपणाला विरोध आहे, असं ते म्हणत आहेत. ते अतिशय गोंधळलेल्या स्थितीत आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांचा देशभक्त मुसलमानांना पाठिंबा होता. हीच भूमिका आमची आणि भाजपाची आहे असे सांगून शिंदे म्हणाले, सातत्याने राहुल गांधी यांची सावली मिळाल्यामुळे, राहुल गांधी यांच्यासोबत राहिल्यामुळे उबाठाला जिना यांची आठवण येते. हे दुर्दैव आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना काय करायचं ते समजत नाही. निर्णय काय घ्यायचे हेही समजत नाही.
काही मुठभर लोकांच्या हातात लाखो, करोडो एकर जमीन होती. वक्फ सुधारणा विधेयकामुळे याला चाप बसणार आहे. काँग्रेसच्या काळात 123 जागा काही लोकांच्या घशात घातल्या गेल्या. आता असे कोणतेही कृत्य करता येणार नाही. मोदी यांच्या निर्णयामुळे मुठभर लोकांना चाप बसेल. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर शाळा होतील, कॉलेजेस, रुग्णालये होतील. महिलांना, मुलांना, विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळेल. त्यामुळेच मुस्लीम लोकांनीही या विधेयकाचे स्वागतच केले आहे, असेही शिंदे म्हणाले.
Uddhav Thackeray is confused, doesn’t know what to say, Eknath Shinde’s comment
महत्वाच्या बातम्या
- Chief Minister : वैदिक गणितावर आधारित गुणवत्ता केंद्र सुरू करणार , मुख्यमंत्र्यांची माहिती
- Maharashtra भाऊसाहेबांकडचे हेलपाटे वाचले, महाराष्ट्रातील शेतकरी हायटेक झाले, शासनाला ७६ कोटी ८० लाख
- Ashish Shelar लागली बत्ती पार्श्वभागाला की.. आशिष शेलार यांच्यावर टीकेवरून संदीप देशपांडे यांना इशारा
- Kunal Kamra मुंबईत येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू…राहुल कनाल यांचा कुणाल कामराला इशारा