विशेष प्रतिनिधी
बीड : आका किंवा त्यांच्या समर्थकांना अमरावती किंवा नागपूर जेलला का पाठवलं जात नाही? शोलेमध्ये आम्ही पाहिलंय की अधिकारी म्हणतात ‘जेल के कोने कोने में हमारे जासूस है’. मग हे जासूस काय करत होते? कालिया चित्रपटात आम्ही तुरुंगात झालेल्या हाणामाऱ्या पाहिल्या होत्या आम्ही. आता बीडच्या तुरुंगात कालिया तयार झालाय की काय कुणास ठाऊक, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड व सुदर्शन घुले यांना बीड तुरुंगात मारहाण झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे. मात्र, तुरुंग प्रशासनाने अशी कोणतीही मारहाण झाली नसल्याचे सांगितले आहे. यावर सुरेश धस यांनी मात्र आपल्याकडे आलेल्या महातीनुसार दोन गटांमध्ये तुरुंगात राडा झाल्याचा दावा केला आहे. त्यात वाल्मिक कराड व सुदर्शन घुलेला महादेव गिते व अक्षय आठवले यांच्या टोळीकडून मारहाण झाल्याचं सांगितले.
यावर पत्रकार परिषदेत बाेलताना धस म्हणाले, फोन करण्यावरून दोन टोळ्यांमध्ये राडा झाला आणि त्यातून वाल्मिक कराड (Walmik Karad) व सुदर्शन घुले यांना मारहाण झाली. दोन टोळ्यांमध्ये वाद झाल्याचं मला समजलंय. प्रशासन सांगताना इतरांची नावं सांगत आहे. पण हा वाद मुख्य दोन टोळ्यांमध्ये झालाय. बीडच्या जेलमध्ये काहीही होऊ शकतं. माझी तर माहिती आहे की आकांना स्वतंत्र जेवणही दिलं जातंय. एक स्पेशल फोन आहे ज्यावरून आकांचं थेट कनेक्शन परळीतल्या कोणत्यातरी फोनशी होतं ही माहिती मला मिळाली आहे.
“एसपींनी लक्ष ठेवायला हवे हाेते अशी अपेक्षा व्यक्त करताना धस म्हणाले, मुख्यालयात असूनही कैद्यांना व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जात होती. प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती का नाही पाहिली? हे बाहेर हत्या करून थकलेत, ते आत जाऊन हत्या करणार नाहीत हे कशावरून? पाच क्रमांकाच्या बॅरेकमध्ये महादेव गिते, सहामध्ये अक्षय आठवले तर नऊमध्ये वाल्मिक कराडला ठेवल्याचं सांगितलं जात आहे. जेवणासाठी किंवा इतर कोणत्या कारणासाठी या आरोपींना बाहेर आणलं असता तेव्हा ही हाणामारी झाली असावी.
“तुरुंगात कर्मचारी कमी आहेत तर अधिकाऱ्यांनी काही आरोपी अमरावती, नागपूर, नाशिक, संभाजीनगर इथल्या तुरुंगात पाठवायला हवं होतं. अनेक आरोपी लातूर तुरुंगच का मागतात? कोणत्या आरोपींचे नातेवाईक लातूर किंवा बीड तुरुंगात काम करतात हे तुरुंग अधिकाऱ्यांना माहिती नसतं का?” असा सवालही धस यांनी उपस्थित केला.
What were your spies doing? Is Kalia in Jail ? Question of Suresh Dhas on Valmik Karad beating case
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
- Kunal Kamra कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकेपासून संरक्षण
- Anna Bansode : विधानसभा उपाध्यक्षपदी निवड अन् दोन दिवसात अण्णा बनसोडेंना उच्च न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश
- Prashant Koratkar प्रशांत कोरटकर यांच्यावर न्यायालयातच वकिलाचा हल्ला