विशेष प्रतिनिधी
मुंबई : मी राजीनामा द्यावा तर का द्यावा? याचं काहीतरी कारण तर लागेल. कुठल्याही घटनेत माझा काहीही संबंध नाही, असा सवाल मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांना केला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर महाराष्ट्रत खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील काही आरोपींना अटक केलं. मात्र, अद्यापही या प्रकरणातील काही आरोपी फरार आहेत. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप विरोधक करत आहेत. वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे करत असल्याचा गंभीर आरोप विरोधक करत आहेत. यावरून धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जावा किंवा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, विरोधकांच्या टिकेला आता धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करत आहेत. यासंदर्भात मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, “मी राजीनामा द्यावा तर का द्यावा? याचं काहीतरी कारण तर लागेल. या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे, ना माझा कुठलाही संबंध आहे. मात्र, उगाचच कोणाचातरी राजीनामा मागायचा?”, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
विजय वडेट्टीवार यांनी “मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो, असा दावा केला होता. त्यांच्या या विधानावर मुंडे म्हणाले की,विजय वडेट्टीवार हे बोलायला हुशार आहेत. मात्र, अशा पद्धतीने लहान आका आणि मोठा आका अशी भाषा मी पहिल्यांदाच ऐकतोय. कोणाचा एन्काऊंटर आणि कोणाचं काय? एक तर बीडच्या प्रकरणात पोलीस प्रशासन आणि सीआयडी व्यवस्थित तपास करत आहेत. संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि ज्यांनी ही हत्या केली त्यांच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. त्यामुळे कोणी काय बोलावं? आणि कोणाचं काय होणार? याला काहीही अर्थ नाही. मुळात बीड हत्या प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे ही मागणी मी सर्वात पहिल्यांदा केली होती.
तुम्ही मंत्री राहिलात तर बीडच्या प्रकरणातील तपासावर दबाव येऊ शकतो, असा आरोप विरोधकांचा आहे. यावर धनंजय मुंडे यांनी म्हटलं की, “त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे दिला आहे. या प्रकरणाचा न्यायालयीन तपास देखील होणार आहे. त्यामुळे त्या तपासाशी कोणताही प्रभाव मी मंत्री राहिल्यानंतर होऊ शकत नाही”, असं स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी दिलं.
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. तसेच बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांना देऊ नये, अशी मागणी देखील करण्यात येत आहे. यासंदर्भात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, “आता काय घडावं हे आम्हाला कळण्याआधी माध्यमांना कळतं. आता मीच मंत्री, मीच पालकमंत्री का नसावं? हे विरोध करणाऱ्या लोकांना विचारलं तर अधिक योग्य होईल”, असं त्यांनी म्हटलं.
सर्वपक्षीय आमदारांचे एकवटणं हे हत्येच्या घटनेबाबत आहे. त्यामुळे ते एकवटले हे चुकीचं झालं असं मला म्हणता येत नाही. कारण ती घटना अतिशय दुर्देवी आहे. त्या घटनेत जे कोणी दोषी असतील त्यांना फाशी व्हावी अशीच सर्वांची भूमिका आहे, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
Why should I resign? Question by Dhananjay Munde
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange : तर मराठे रस्त्यावर उतरणार, मनोज जरांगे यांचा इशारा
- Uddhav Thackeray : चंद्रकांतदादांकडून उध्दव ठाकरे यांचा करेक्ट कार्यक्रम, पुण्यातील पाच नगरसेवक करणार ठाकरेंना जय महाराष्ट्र
- Ministry of Defence : संरक्षण मंत्रालयाने 2025 हे ‘सुधारणेचे वर्ष’ म्हणून केले घोषित
- Suresh Dhas : माध्यमांमध्ये बोलण्यापूर्वी सरकारशी चर्चा करा, आमदार सुरेश धस यांना बावनकुळेंची तंबी