विशेष प्रतिनिधी
नाशिक : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. 1995 साली त्यांनी कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंवर करण्यात आला आहे.
त्यांच्या विरोधात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. यात त्यांनी माणिकराव कोकाटे यांंच्यावर 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप केला होता. या आरोपांनुसार भादवी 420, 465, 471,47 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आता याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते असे बोललं जात आहे.
जर वरच्या कोर्टाने स्थगिती दिली नाही, तर मात्र त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्या विरोधात सारकवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 1995 ते 97 काळात सरकारच्या 10 टक्के कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक जिल्हा न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरु आहे.