विशेष प्रतिनिधी
मुंबई : आशेचा किरण एकच आहे की फक्त महाराष्ट्रच नाही तर भारतभरातली माध्यमं या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. सर्व पक्षाचे लोक माणुसकीच्या नात्याने एकत्र आले आहेत हे महाराष्ट्र अजूनही सुसंस्कृत आहे हे दर्शवत आहे. आता काय निर्णय घ्यायचा हे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ठरवायचंय”, असं आवाहन सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीस यांना केलं.
सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, गेल्या २८ दिवसांपासून या प्रकरणाची चर्चा आहे. त्या कुटुंबाचे अश्रू पाहून अस्वस्थ वाटतं. या सरकारने थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा. काल मुख्यमंत्र्यांचं विधान आलंय की कुणालाही सोडणार नाही. पोलिसांनी ज्या प्रकारची भाषा बजरंग सोनावणेंबाबत वापरली किंवा अंजली दमानिया किंवा सुरेश धस ज्या गोष्टी बोलत आहेत त्या प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या आहेत. असं कसं चालणार? कुठल्याही गोष्टीमध्ये काही विषय असे असतात की ज्यात राजकारण बाजूला ठेवूनच काम करावं लागतं. या राज्यात माणुसकी आहे की नाही? त्या कुटुंबाला माणुसकीच्या नात्याने न्याय मिळायलाच पाहिजे.
अशोक चव्हाण यांचं उदाहरण देत सुप्रिया सुळे म्हणाल्या, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. सरकारनं संवेदनशीलपणे या सगळ्याचा विचार करावा. मला अजूनही तो दिवस आठवतोय, जेव्हा अशोक चव्हाण यांच्यावर आरोप झाले तेव्हा नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे आता सरकारला ठरवायचंय की त्यांनी काय करावं.
दरम्यान, मी काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही. मी आज कॅबिनेटच्या बैठकीसाठी आलो आहे, अशा शब्दांत मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याच्या चर्चेवर उत्तर दिले.राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक आज आहे. त्यासाठी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना एका वाक्यात उत्तर दिले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मागच्या महिन्यात क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा संशयित मास्टरमाईंड वाल्मिक कराड हा ३१ डिसेंबरला पोलिसांना शरण आला. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा अत्यंत जवळचा माणूस आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली पाहिजे. नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा दिला पाहिजे असंही विरोधक म्हणत आहेत. सर्वपक्षीय नेत्यांनी याच प्रकरणात राज्यपालांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
संतोष देशमुख यांच्या हत्येची तीन यंत्रणांकडून स्वतंत्रपणे या हत्येची चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंतच्या चौकशीत कोणाचीच नावे पुढे आलेली नाहीत. जोपर्यंत कोणावर ठपका ठेवला जात नाही तोपर्यंत कारवाई कशी करणार? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे एका अर्थाने त्यांनी धनंजय मुंडे यांना अभयच दिले आहे.
In the case of Deshmukh’s murder, all people from various Party’s are united as humanity, Supriya Sule said, a ray of hope
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली