विशेष प्रतिनिधी
मुंबई : Atul Parchure कर्करोगावर यशस्वी मात करूनही चुकीच्या उपचारांमुळे ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी आणि आई असा परिवार आहे.
नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रात त्यांनी अजरामर भूमिका केल्या होत्या. विनोदी किंवा गंभीर भूमिका असो अतुल परचुर तितक्याच ताकदीनं त्या भूमिकेला न्याय द्यायचे.
नातीगोती नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली. नातीगोती नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं. नातीगोती नाटकात स्वाती चिटणीस यांनी अतुल परचुरेंच्या आईची भूमिका साकारली होती. त्या नाटकात अतुल परचुरे यांनी गतिमंद मुलाची भूमिका साकारली होती.
नातीगोती नाटकाचे त्यांनी अनेक प्रयोग केले होते. व्यक्ती आणि वल्ली या नाटकात पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकारली होती. ‘माझा होशील ना’ या मालिकेतील ‘जेडी’ या खलनायकाची त्यांची भूमिकाही प्रचंड गाजली होती. मराठीतच नव्हे, तर हिंदी मनोरंजनसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना कर्करोगासारखा गंभीर आजार झाला होता. त्यावरही मात करत ते जिद्दीने उभे राहिलेत. ‘खरं खरं सांग’ या नाटकाच्या निमित्तानं त्यांनी रंगभूमीवर पुनरागमन केलं होतं.
अतुल परचुरे त्यांच्या लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात फिरण्यासाठी गेले होते. या सुट्टीदरम्यान त्यांची भूक मंदावली होती. त्यावर उपाय म्हणून त्यांनी काही औषधेही घेतली, परंतु त्याचा काहीच फायदा होत नव्हता. भारतात परतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी अल्ट्रासोनोग्राफी केली. त्यावेळी त्यांच्या पोटात ट्यूमर सापडला आणि त्यात कॅन्सर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. यातून ते बरे होतील, असा विश्वास डॉक्टरांनी त्यांना दिला. परंतु उपचारादरम्यान त्यांची तब्येत आणखी बिघडत गेली. शस्त्रक्रियेलाही विलंब झाला.
कॅन्सर झाल्याचे कळल्यानंतर पहिल्यांदा घेतलेले उपचारच चुकले होते. त्यांच्यावर योग्य उपचार झाले नव्हते अन् अडचणीत वाढ झाली.चुकीच्या उपचाराने त्यांची प्रकृती बिघडत गेली. त्यांना चालताना, बोलताना त्रास होत असताना डॉक्टरांनी त्यांना दीड महिने प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला होता. शस्त्रक्रिया करण्यात अनेक अडथळे असल्याचे व त्यातून परिस्थिती आणखी बिघडू शकते, असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांकडे पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा योग्य उपचारांना सुरुवात झाली आणि त्यांनी केमोथेरपी घेतली. या काळात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने त्यांना साथ दिली.
योग्य उपचारानंतर अतुल परचुरे आता पूर्ण पणे बरे झाले होते. अद्यापही त्यांच्यावर उपचार सुरू असले तरी ते पूर्ण बरे असल्याचे सांगितले जात होते. कॅन्सरमुळे द कपिल शर्मा शोमध्ये परफॉर्म करू शकले नाहीत., याबद्दलही अतुल परचुरेंना वाईट वाटत होते. त्यांच्या विदेश दौऱ्यातही ते सहभागी होऊ शकले नाहीत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत अतुर परचुरे यांच्या निधनच्या वृत्तावर शोक व्यक्त केला आहे. “प्रिय अतुल खरं खरं सांग आयुष्याच्या रंगमंचावरून अशी धक्कादायक एक्झिट घेताना तुझ्यावर, तुझ्या नाटकांवर अलोट प्रेम करणाऱ्या, अनेकानेक भूमिकांचा आनंद घेणाऱ्या रसिकांची तू काहीच पर्वा केली नाहीस. चटका लावून निघून गेलास. तुझ्या गालावरची गोड खळी आणि प्रसन्न हास्याने मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा अतुल परचुरे नावाचा अभिनेता आमच्यात नाही, हे वास्तव स्वीकारणे जड आहे. वेदना देणारे आहे.
तुझ्या मराठी मालिका, नाटके आणि चित्रपट, इतकंच नव्हे तर हिंदी मालिका आणि चित्रपटातूनही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या भरोशावर तू जीवघेण्या आजारावर मात केलीस आणि ‘खरं खरं सांग..’ या नाटकातून तू पुन्हा रंगमंचावर दमदार एंट्री केली. तुझ्यातला अभिनेता सगळ्यांनी अनुभविला आणि सायंकाळी ही बातमी खूप धक्का देवून गेली. माझी विनम्र श्रद्धांजली..!!”, अशा शब्दांत बावनकुळे हळहळले.