विशेष प्रतिनिधी
मुंबई : कुंभमेळ्याच्या तयारीसाठी राज्य अर्थसंकल्पात भरीव तरतूद करायला हवी होती मात्र केली नाही. जलसंपदा विभागाला अधिक निधी द्यायला हवा होता, शैक्षणिक शुल्काचे शिक्षण संस्थांचे शेकडो कोटी दिलेले नाहीत, अशा विविध मुद्यांवर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी अर्थमंत्री अजित पवार यांना चांगलेच धारेवर धरले.
नाशिक येथे दर 12 वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा 2 वर्षावर आला असून या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी राज्य अर्थसंकल्पात भरीव तरतूद करायला हवी होती. तुम्ही ऐनवेळी निधी देणार, मग कामे गुणवत्तेची कशी काय होणार?” असा सवाल करत भुजबळ यांनी अर्थसंकल्पावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली.
विधानसभेत अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा झाली. या चर्चेत सहभागी होताना छगन भुजबळ यांनी नाशिक सिंहस्थ मेळ्याचा मुद्दा उपस्थित केला. “नाशिकच्या कुंभमेळ्याच्या तयारीला सरकारने लागले पाहिजे. निधीला विलंब झाला तर कामे गडबडीत होतात. गेल्या कुंभमेळ्यास राज्य सरकारने पैसे वेळेत दिले होते. त्यामुळे कामे उत्तम झाली होती. या अर्थसंकल्पात कुंभमेळ्यासाठी निधीची तरतूद असेल असे वाटले होते. प्रयागराज इतके पैसे नाशिकला मिळणार नसले तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले तर केंद्र चांगली मदत करेल,” असे छगन भुजबळ म्हणाले.
महाराष्ट्राच्या वाट्याला 110 टीएमसी पाणी आले आहे. यापैकी 11 टीएमसी पाणी आजपर्यंत आपण अडवू शकलो आहोत. आजही 99 टीएमसी पाणी इतर राज्यात वाहून जाते आहे. पाणी अडवण्याकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे. अन्यथा मराठवाड्यातील दुष्काळ आपण हटवू शकणार नाही. त्यासाठी जलसंपदा विभागाला अधिक निधी दिला पाहिजे. या विभागाची कामे प्राधान्याने करा अन्यथा पाण्यासाठीची भांडणे थांबणार नाहीत,” असा सल्ला आमदार छगन भुजबळ यांनी यावेळी दिला.
देशात सरासरीच्या तुलनेत राज्यात अंडी आणि दूधाची उपलब्धता कमी आहे. कृषी क्षेत्रातली आपली पिछेहाट खेदजनक आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे अडलेले आहेत. ‘शिक्षण हक्क कायद्यानुसार’ दुर्बल घटकातील 25 टक्के विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्काचे शिक्षण संस्थांचे शेकडो कोटी दिलेले नाहीत.वसतीगृहांचे भोजनाचे पैसे महिनोनमहिने मिळत नाहीत, याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले. शिवभोजन थाळी योजना बंद करण्याचा सरकारचा विचार असला तरी तसा निर्णय घेऊ नये,” अशी विनंती आमदार छगन भुजबळ यांनी यावेळी राज्य सरकारला केली.
Chhagan Bhujbal took Ajit Pawar to task in the Assembly
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray तुमच्या बापाने मुंबई दिली नाही, ती मराठी माणसाने लढून मिळवली, उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका
- Uday Samant आता मंत्री उदय सामंत अडचणीत, वडिलांच्या कंपनीने महामार्गाच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप
- खोटे आरोप करण्याची हिम्मत… धनंजय मुंडे यांचा सुरेश धस यांना इशारा
- क्रूर, लुटारू औरंगजेबाचे खानदानच लुटेरे, बाबा रामदेव म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजच आमचे आदर्श