Devendra Fadnavis : धारावीचा कायापालट होणार; 2028 पर्यंत 10 हजार घरे देण्याचे लक्ष्य, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Devendra Fadnavis  आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी सुरू असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प केवळ इमारती उभारण्याचा नसून धारावीकरांच्या सर्वांगीण विकासाचा उपक्रम असल्याचे स्पष्ट केले. सिंगापूर आणि हाँगकाँगच्या धर्तीवर आधुनिक, जागतिक दर्जाचा विकास करताना स्थानिक नागरिक, त्यांची उपजीविका आणि धारावीची वैशिष्ट्यपूर्ण ओळख जपण्याचे निर्देश त्यांनी दिले.Devendra Fadnavis

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, धारावीतील संपूर्ण औद्योगिक आणि सामाजिक व्यवस्था कायम ठेवली पाहिजे. व्यावसायिक विकास महत्त्वाचा असला तरी लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. रहिवाशांच्या रोजगार आणि उपजीविकेचे संरक्षण करणे ही प्रकल्पाची प्रमुख जबाबदारी असेल.Devendra Fadnavis



धारावीतील कुंभारवाड्याचे सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या असलेले महत्त्व अधोरेखित करताना त्याचे वैशिष्ट्यपूर्ण अस्तित्व कायम ठेवण्यासाठी संबंधितांशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच प्रकल्पात नेचर पार्कची संकल्पना प्रत्यक्षात आणून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनावर भर देण्यास सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात 2028 पर्यंत किमान 10 हजार घरे नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले. प्रकल्पासाठी लागणारे सर्व परवाने एकाच ठिकाणी आणि जलदगतीने मिळावेत यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली.

बैठकीत प्रकल्पांतर्गत रोजगारनिर्मिती, महिला सक्षमीकरण, लघुउद्योगांचे संरक्षण आणि आधुनिक पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला जात असल्याची माहिती देण्यात आली. धारावीतील चामडे, वस्त्रनिर्मिती, पुनर्वापर उद्योग, मातीची भांडी आणि खाद्यपदार्थ उद्योगांचे अस्तित्व कायम राखण्यासाठी विशेष एमएसएमई योजना तयार केली जात आहे. खाद्यपदार्थ उद्योगांसाठी आधुनिक ‘क्लाऊड किचन’ संकल्पना विकसित करण्याचाही प्रस्ताव आहे.

पात्र रहिवाशांना स्वतंत्र स्वयंपाकघर, शयनकक्ष, स्वच्छतागृह आणि नैसर्गिक प्रकाश व्यवस्था असलेली घरे दिली जाणार असून महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह सुविधेलाही विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

याशिवाय, धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत देशातील पहिला अत्याधुनिक मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. या केंद्रातून पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेसह विविध मेट्रो मार्ग एकमेकांशी जोडले जातील. भविष्यात बुलेट ट्रेनची जोडणीही धारावीपर्यंत आणण्याचा विचार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

सर्व विभागांनी समन्वयाने काम केल्यास हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन मुंबईला जागतिक दर्जाची नवी ओळख मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Dharavi set for transformation; Devendra Fadnavis targets 10,000 homes by 2028

महत्वाच्या बातम्या