विशेष प्रतिनिधी
नागपूर: एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीत यावे. त्यांना अलटून-पालटून मुख्यमंत्री पदाची संधी देऊ असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. त्यावरून त्यांनी यू टर्न घेतला आहे. बुरा ना मानो होळी है म्हणत आपण गमतीने ही वक्तव्य केल्याचे त्यांनी म्हटले आहे..
नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर पटले म्हणाले, काल होळीचा , धुलीवंदनाचा दिवस होता. आमच्या संस्कृतीमध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे. आपापसातील सगळे मतभेद विसरून आम्ही सर्वांनी राज्यातील जनतेला न्याय मिळवून दिला पाहिजे. यामुळे राज्यात सध्याच्या राजकीय घडामोडी चालल्या आहेत. त्यामुळे मी सुरुवातीलाचं म्हंटल आहे की, बुरा नं मानो होली है! असं म्हणून त्या विषयाला मी गमतीनं घेतलं आहे. काही लोक सिरीयस घेत असतील तर, त्यांनी सिरीयस राहावं. हे सगळ्यांसाठीचं आहे.
पटोले म्हणाले, आमच्यासाठी खऱ्या अर्थानं महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांना साधं विद्युत मिळत नाही, सौर ऊर्जेचे पंप द्यायला सरकार निघाली होते ते पण देत नाहीत. जंगली जनावरांचा गावांमध्ये हैदोस आहे. वाघ फिरत आहेत. तरुण पोरांच्या हाताला काम नाही, महागाई आभाळाला टेकलेली आहे.
राज्यावर कर्जाचा डोंगर वाढलेला आहे. राज्यात सर्वात उंच कोणतं डोंगर असेल तर, राज्यावर असलेलं कर्जाचा डोंगर हे सर्वात उंच आहे. सर्वसामान्यांना जगणं मुश्किल झालेलं आहे. ही काळजी काँग्रेसला आहे. काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून आम्हाला काळजी आहे की, जनतेच्या प्रश्नाला घेऊन चर्चा व्हावी.
काल थट्टेचा दिवस होता थट्टा आता संपली. सरकारने आता खऱ्या अर्थानं त्या प्रश्नाला घेऊन आणि माध्यमानेही समोर यावे असे नाना पटोले म्हणाले.