विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी पक्षाच्या भाजप खासदाराला दिलेल्या धक्क्यामुळे मी खाली पडलो आणि माझ्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, असा आरोप खासदार प्रतापचंद्र सारंगी यांनी केला आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संसद सभागृहात बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काढलेल्या उद्गरावरून इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि घटक पक्षांनी शाह यांच्या विधानावर जोरदार आक्षेप नोंदवला आहे. हा आक्षेप नोंदवताना विरोधकांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शनेही केली. याचवेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संघर्ष झाल्याचे समजते.
भाजप खासदाराने आरोप केला की, राहुल गांधी यांनी खासदारांना धक्काबुक्की केली. संसदेमध्ये मी पायऱ्यांजवळ उभा होतो. या वेळी राहुल यांनी एका खासदाराला धक्का दिला. तो माझ्या अंगावर पडला. ज्यामुळे मी खाली पडलो आणि जखमी झालो, असे प्रताप सारंगी यांनी म्हटले आहे. दरम्यान, याबाबतचा एक व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवरही सामायिक केला आहे.
सारंगी यांच्या आरोपावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधी म्हणाले, “हो, मी केलय, ठीक आहे. धक्का-बुक्कीने काही होत नाही. मला संसदेच्या आता जायचं होतं. संसदेत जाणं माझा अधिकार आहे. मला थांबवण्याचा प्रयत्न झाला. मला संसदेत आत जाण्यापासून रोखण्यात आलं. भाजप खासदार धक्का बुक्की करत होते. हे संसदेच प्रवेशद्वार आहे. भाजपचे खासदार मला ढकलत होते. धमकावत होते. भाजप खासदारांनी प्रवेशद्वार रोखून धरलं होतं. ते मला सतत ढकलत होते, धमकावत होते.