विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता रद्द व्हावी, यासाठी मुंबईतील उत्तर भारतीय विकास सेना पक्षाच्या सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. मनसेची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष राेहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी राज ठाकरे यांना धाेक्याचा इशारा दिला आहे. ‘मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे ‘महाशक्ती’ तर नाही ना?’ अशी शंका रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली आहे.
खडसे म्हणाले, कालपासून मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली जात आहे. पक्षाला विविध इशारे दिले जात आहेत, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट केले जात आहे. बंधू राज साहेब, मराठी पक्षांचे, मराठी उद्योजकांचे, मराठी भाषेचे किंबहुना महाराष्ट्र आणि मराठी माणसांचे काही पक्षांना वावडं आहे. कारण याआधीही मराठी माणसांनी बनवलेले दोन मराठी पक्ष फोडण्यात आले आहेत. तुम्ही एकदा तपासून घ्यावे मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही?”, असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची व्हावी आणि व्यवहारातही हीच भाषा वापरली जावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने भूमिका घेत असते. आताही त्यांनी अशाच पद्धतीने बॅंकांमध्ये आंदोलन सुरू केलं होतं. राज्यातील बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते की नाही हे तपासण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानुसार, मनसे कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरला. या आंदोलनाला अनेकदा हिंसक वळणही लागलं. मनसे कार्यकर्त्यांनी मराठीला विरोध करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना मारहाण केली. मनसेच्या या आंदोलनानंतर उत्तर भारतीय विकास सेनेने राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे.
मुंबईतील उत्तर भारतीय विकास सेनेचे सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरोधात सर्वोच न्यायालयात याचिका दाखल केली. राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. “राज ठाकरे हे उत्तर भारतीय लोकांविरोधातील हिंसेला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांच्या पक्षाची मान्यता देखील रद्द करावी”, असं शुक्ला यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे.
Rohini Khadse gave this warning saying Brother Rajsaheb
महत्वाच्या बातम्या