विशेष प्रतिनिधी
Mumbai News: आमच्या विभागाची फाईल अर्थमंत्र्यांपर्यंत पोहोचू दिली जात नाही, असा आरोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केला आहे. मार्च महिन्यासाठी फक्त ५६ टक्के पगार मिळाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत अर्थ सचिवांशी चर्चा केली असून, उर्वरित ४४ टक्के पगाराची रक्कम येत्या मंगळवारपर्यंत वितरित करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात अर्थ खात्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “आम्ही अर्थ खात्याकडे ९२८ कोटी रुपयांची मागणी केली होती, पण फक्त २७२ कोटी रुपयेच मंजूर करण्यात आले. ते पुढे म्हणाले, “एसटी कर्मचारी कमी पगारात कुटुंब चालवत असताना, त्यांना वेळेवर संपूर्ण पगार न मिळणं ही गंभीर बाब आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी हस्तक्षेप केल्यानंतर मार्चचा उर्वरित पगार मिळणार असला, तरी हे केवळ तात्पुरतं उपाय आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार दिला जातो, मग एसटी कर्मचाऱ्यांनाही तो का मिळू नये? ही जबाबदारी अर्थ खात्याची आहे.”
सरनाईक यांनी सांगितले की, “आम्ही अर्थ खात्याकडे भीक मागत नाही, आमचा हक्क मागतोय. जर तोही नाकारला जात असेल, तर ही परिस्थिती अस्वीकार्य आहे. आमच्या विभागाची मागणी वाढीव नव्हे, तर आवश्यकतेनुसार आहे. तरीही फाईल अर्थ मंत्रालयाकडे पोहचण्याऐवजी परत पाठवली जाते, हे दुर्भाग्यपूर्ण आहे.”
“फक्त २७२ कोटी रुपयांत आम्ही संपूर्ण पगार कसा देणार? म्हणूनच मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर आणि संपूर्ण पगार मिळालाच पाहिजे,” अशी ठाम भूमिका सरनाईक यांनी मांडली.
ST file is not being allowed to reach the Finance Minister, alleges Transport Minister Pratap Sarnaik
महत्वाच्या बातम्या