विशेष प्रतिनिधी
मुंबई : नाशिकमध्ये 2027 साली होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक परिसरात वाढणारी रहदारी, साधू-संत-महंत आणि भाविकांची होणारी गर्दी याचा विचार करून योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी तातडीने सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले. नाशिक शहरात येणाऱ्या भाविकांना उत्तमोत्तम वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ई-बस एकात्मिक सुविधेचा प्रस्तावही तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
मंत्रालयात आयोजित बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक बाह्यवळण रस्त्याच्या कामांचा आढावा घेतला. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बाह्यवळण रस्त्यांतर्गत येणाऱ्या मार्गांची कामे प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश देऊन फडणवीस म्हणाले, नाशिक विभागीय आयुक्त आणि नाशिकचे पालक सचिव यांनी प्राधान्याने सुरू करावयाच्या रस्त्यांचा आराखडा येत्या 10 दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करावा. बाह्यवळण मार्ग, परिक्रमा मार्ग यांच्याबरोबरच अस्तित्वातील रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे तातडीने सुरू करावीत. विमानतळ, समृद्धी महामार्ग यांना जोडणाऱ्या मार्गांची कामे युद्धपातळीवर सुरू करा. तसेच शहरातील आवश्यक रस्त्यांची कामे देखील महापालिकेमार्फत नगर नियोजन अंतर्गत घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक येथे मुंबई, जव्हार, गुजरात, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, धुळे, पुणे, मुंबई अशा मार्गाने भाविक येण्याची शक्यता आहे. त्या मार्गातील रस्त्यांचे बळकटीकरण करण्यासह त्या रस्त्यांवर वाहनतळांची सुविधा निर्माण करावी. नाशिक शहरात येणाऱ्या भाविकांना उत्तमोत्तम वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ई-बस एकात्मिक सुविधेचा प्रस्ताव तयार करा. नाशिकमधील रहदारीचे योग्य नियोजन करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करा, असे निर्देश फडणवीस यांनी यावेळी दिले.
देशातील शहरांना विकास केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी शहरांचा सर्जनशील पुनर्विकास, शहरांच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या प्रस्तावांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने ‘शहरी आव्हान निधी’ स्थापन केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘शहरी आव्हान निधी’ कार्यक्रमांतर्गत नाशिक शहरातील वाहतूक समस्येचा समावेश करून नागरिकांचा प्रवास सुखकर करण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी दिल्या.
नाशिक बाह्यवळण मार्गातील 137 किलोमीटरचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ग्रीनफील्ड अलाईनमेंटद्वारे उभारण्यात येणार आहेत. जुन्या नाशिक-मुंबई महामार्गापासून पुढील 69 किलोमीटरचा मार्ग हा ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’मार्फत बांधण्यात येणार आहे. यातील 41 किलोमीटरचे रस्ते महापालिका हद्दीबाहेरून जातात. या रस्त्यांसाठी 40 गावांमधील 500 हेक्टरचे भूसंपादन करावे लागणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
या बैठकीला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.
The proposal for the Nashik bypass project should be submitted to the cabinet immediately, Chief Minister Devendra Fadnavis has directed.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : उध्दव – राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले
- Chief Minister : तंत्रज्ञानाच्या मदतीने शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा, मुख्यमंत्र्यांचे डाॅक्टरांना आवाहन
- Supreme Court : मग संसद भवनच बंद करा.. उपराष्ट्रपतींपाठाेपाठ भाजपचे खासदार सर्वाेच्च न्यायालयावर बरसले
- West Bengal : हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागातील महिलांची राज्यपालांपुढे कैफियत