विशेष प्रतिनिधी
Mumbai News: वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना देखील एकदा दोनदा चूक झाली, तर समजून घेऊ…मात्र तिसऱ्या वेळी माफी नाही तर मंत्रिपद बदलू असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला. महायुती सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री टार्गेटवर आहेत. धनंजय मुंडे याना राजीनामा द्यावा लागला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जुन्या प्रकरणावरून अडचणीत आले असताना वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची रणनीती ठरली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवार, मंगळवार, बुधवार मुंबईत शासकीय कामकाज पाहणार असल्याची माहिती समोर आली आहे. उरलेले 4 दिवस अजित पवार महाराष्ट्र दौरा करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री, विधान परिषद आमदार यांना देखील राज्यभरातील दौऱ्यांचं शेड्युअल तयार करून तत्काळ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना कळवण्याचे आदेश अजित पवारांकडून देण्यात आले आहेत. सदर दौऱ्यांच्या दरम्यान पदाधिकारी मेळावे, सदस्य नोंदणी, बूथ बांधणी आणि संघटन वाढवण्याच्या सूचना देखील अजित पवारांनी दिल्या आहेत.
अजित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना बेशिस्त वागणुकीवरुन झापल्याची माहिती देखील समोर आली आहे. सातत्याने माध्यमांमध्ये पक्षाला अडचणीची ठरणारी वक्तव्य करणे, जनता दरबारला पक्ष कार्यालयात हजर न राहणे यावरून अजित पवारांनी झापले. माणिकराव कोकाटे आज बैठकीसाठी देखील अर्धा तास उशिरा आल्यामुळे अजित पवारांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज नियमित मंगळवारची बैठक देवगिरी निवासस्थानी पार पडली.
अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे. वक्फ सुधारणा विधेयकातील काही मुद्यांबाबत ही भेट असल्याची सूत्रांची माहिती आहे. या भेटीत शिष्टमंडळ अमित शाह यांनी सभागृहात जे आश्वासन दिलं ते कागदावर असाव अशी मागणी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. वक्फ बोर्डावर गैर मुस्लिम सदस्य नको, अनेक वर्षापासून वक्फ बोर्डकडे जी जमीन आहे, त्याचे मूळ मालक कोण याचा शोध घेण्याबाबत जो मुद्दा मांडला आहे. त्याचा विचार करावा अशी मागणी करण्यात येणार आहे. विधेयकामध्ये 40 पैकी 14 विषय बाजूला करण्यात आले आहेत, अशी सभागृहात माहिती देण्यात आली. त्याबाबत देखील कागदोपत्री स्पष्टता आणावी याबाबत देखील विनंती करणार आहे. पक्षाकडून माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर सदर भेटीसाठीचे निवेदन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
There is no forgiveness for the third mistake, Ajit Pawar warns ministers
महत्वाच्या बातम्या