विशेष प्रतिनिधी
पुणे: स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणातील पीडितेला राज्य सरकारकडून तीन लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. राज्य सरकारच्या ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. ही मदत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून दिली जाणार असून, त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच ही रक्कम पीडितेला प्रदान केली जाईल.
पीडितेच्या मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनासाठी ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून तीन लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
बलात्काराची ही धक्कादायक घटना २५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटेच्या वेळी स्वारगेट एसटी स्थानक परिसरात शिवशाही बसमध्ये घडली होती. पीडित तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी दत्तात्रय गाडे याला अटक केली होती. त्याला १२ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते, त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
अत्याचार प्रकरणात पिडीत तरुणीने राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून अॅड. आसिम सरोदे यांनाच विशेष सरकारी वकिल म्हणून नेमावे, अशी मागणी केली आहे. त्यासोबतच पुणे पोलिसांवर नाराजी देखील व्यक्त केली आहे. धक्कादायक म्हणजे, त्या पहाटे आरोपी गाडेने दोनदा अत्याचार केल्यानंतर पुन्हा तिसऱ्या वेळी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोरदार विरोधानंतर तो नराधम गाडे पळून गेला, असे तिने सचिवांना लिहीलेल्या पत्रात म्हंटले आहे.
3 lakh rupees help from the state government to the victim of Swargate rape case
महत्वाच्या बातम्या