विशेष प्रतिनिधी
पुणे: महाराष्ट्र सरकारने विधान परिषदेत माथाडी हमाल कायद्यात दुरुस्ती प्रस्तावित करून हातावर पोट असणाऱ्या कष्टकऱ्यांवर अन्याय केला असून, याच्या निषेधार्थ राज्यव्यापी सत्याग्रह छेडण्यात येईल, असा इशारा हमाल माथाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी दिला.
हमाल माथाडी कायद्यातील प्रस्तावित दुरुस्ती विरोधात आयोजित मोर्चाच्या समारोप सभेत ते बोलत होते. त्याआधी छत्रपती शिवाजी पुतळा मार्केटयार्ड येथून दुचाकी, टेम्पो, जीप आदी वाहनातून विधानभवन येथील विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता.
सात महिन्यांपूर्वी माथाडी कायद्यात ३४ वी दुरुस्ती सादर करण्यात आली होती. त्यावेळी संघटनांनी विरोध दर्शविल्यामुळे दुरुस्ती स्थगित करून चर्चेसाठी समिती नेमण्यात आली होती. तीन आठवड्यांपूर्वी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी हमाल माथाडी महामंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही दुरूस्ती केली जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पाळण्यात आले नाही आणि बुधवारी विधान परिषदेत दुरुस्ती विधेयक आणले गेले, याबाबत संताप व्यक्त करत डॉ. आढाव यांनी तीव्र विरोध दर्शविला.
मोर्चात पुण्यासह नगर, औरंगाबाद, पंढरपूर, बीड, करमाळा, बार्शी, रत्नागिरी आदी भागातील संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे, नितीन पवार, संतोष नांगरे, गोरख मेंगडे, अंबरनाथ थिटे, हनुमंत बहिरट यांची भाषणे झाली.
माथाडी हमाल कायदा हा देशातील असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा देणारा पहिला कायदा आहे. उद्योगपतींच्या दबावाखाली राज्य शासनाने हा कायदा दुर्बल करण्यासाठी दुरुस्ती आणली आहे, असा आरोप डॉ. आढाव यांनी केला. नितीन पवार यांनी सांगितले की, असंघटितांना सामाजिक सुरक्षा देण्याचा विचार जेव्हा होतो त्या वेळेला माथाडी कायद्याचा आधार घेतला जातो. त्यामुळे हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु, सरकारच्या भांडवलदार धार्जिण्या भूमिकेमुळे कष्टकऱ्यांच्या हक्कांवर गदा येत आहे. सुभाष लोमटे यांनी सरकारच्या भूमिकेवर आक्षेप घेत सांगितले की, प्रस्तावित दुरुस्तीमुळे माथाडी कामगारांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आली आहे. तसेच, सरकारने माथाडी संघटनांशी चर्चा न करता गडबडीत विधेयक सादर केले आहे. तर संतोष नांगरे यांनी काही काही गुंड व राजकीय वरदहस्त असणाऱ्या मंडळीकडून होणाऱ्या गैरप्रकारांवर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना निवेदन छत्रपती शिवाजी पुतळा मार्केटयार्ड येथून विधानभवन येथील विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना निवेदन सादर केले. सरकारने माथाडी कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात सुपा येथे आदिवासी ऊसतोड कामगारांना वेठबिगार ठेवण्याच्या तसेच महिला कामगारांना पळवून नेऊन बलात्कार करण्याच्या भयानक घटना घडल्या. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली. या अत्याचारांविरुद्ध शिष्टमंडळाने डॉ. पुलकुंडवार यांना निवेदन दिले आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावर तातडीने प्रतिक्रिया देत त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना तक्रार पाठवून कारवाईचे आदेश दिले.
Dr. Baba Adhav warns of state-wide Satyagraha against government fraud
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची तिच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका
- Devendra Fadanvis : पुण्यात कोयता गँग नाही पण भाई होण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दहशत, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Hemant Rasne : हिंजवडी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी
- Eknath Shinde : दोन्ही शिवसेनेत एक्स वॉर, एकनाथ शिंदे राजकीय कीड म्हणाल्याने आदित्य ठाकरेंवर सूर्याजी पिसाळ मनात पलटवार