विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध मागण्यांसाठी पुण्यात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतली. त्यांच्याकडे आपली व्यथा मांडली.
पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयात ही भेट झाली. काल रात्री विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी मोठं आंदोलन केलं होतं. सकाळी त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
सुमारे अर्धा तास विद्यार्थ्यांशी चर्चा झाली. यावेळी शरद पवारांनी विद्यार्थ्यांसमोरच थेट MPSC आयोगाचे अध्यक्ष रजनीश शेठ यांना फोन केला आणि त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. पवारांच्या मध्यस्थीनेच रजनीश शेठ यांनी विद्यार्थ्यांना भेटीची वेळ दिली आहे.
शरद पवारांशी फोनवरून बोलताना रजनीश शेठ यांनी विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही दिली. त्यामुळे आता विद्यार्थी आणि आयोग यांच्यात थेट संवाद होणार असून, या चर्चेतून सकारात्मक निर्णय निघण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या (राज्यसेवा) निकालातील गोंधळ, आणि प्रक्रियेमधील पारदर्शकतेच्या अभावामुळे नाराज झालेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. कटऑफपेक्षा अधिक गुण मिळवूनही गुणवत्तायादीत स्थान न मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. परीक्षा पुढे ढकलावी आणि पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांच्या जागांमध्ये वाढ करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
महाराष्ट्र गट ‘ब’च्या पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) परीक्षेसाठी राज्य सरकारतर्फे ४४१ पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले होते. राज्यात होणाऱ्या निवडणुकांमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आयोगाने मागणीपत्र राज्य सरकारकडे परत पाठवले. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये ‘पीएसआय’ पदांसाठी केवळ २१६ जागांसाठी जाहिरात काढली. राज्य सरकारने २२५ जागा का कमी केल्या? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित करत पीएसआय पदांच्या संख्येमध्ये वाढ करावी, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली.
Protesting MPSC students expressed their grievances to Sharad Pawar
महत्वाच्या बातम्या