विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य सरकारला शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे, पण तो लादायचा नाही. सरकार या प्रकरणी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढले पाऊल उचलेल, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत स्पष्ट केली. Shaktipeeth Highway
प्रस्तावित महामार्गामु्ळे मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांचे चित्र बदलणार आहे. शेतकऱ्यांना हा महामार्ग हवा आहे. समृद्धी महामार्गामुळे 12 जिल्ह्यांतील जीवनमान बदलले. त्यानुसार या महामार्गामुळेही अनेकांचे जीवन बदलणार आहे. आज जसा या प्रकल्पाविरोधात मोर्चा आला, त्याहून तिप्पट गर्दी हा महामार्ग व्हावा यासाठी आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाला होईल. ज्या गावांमध्ये सभा झाल्या. त्या गावांतील शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला आहे. या प्रकरणी जमिनीच्या पाचपट भाव दिला असून, यासंबंधी विरोधकांनीही मदत करावी, असे ते म्हणाले. Shaktipeeth Highway
प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला राज्यातील शेतकऱ्यांकडून वारंवार विरोध करण्यात येत आहे. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन देखील केले आहे. सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. याचपार्श्वभूमीवर सांगली आणि कोल्हापूरसह 12 जिल्ह्यातील शेतकरी आझाद मैदानावरील आंदोलनासाठी एकवटले आहेत. या आंदोलक शेतकऱ्यांची शिवसेना ठाकरे गटाचे आंबादास दानवे, काँग्रसचे आमदार सतेज पाटील आणि शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी भेट घेतली. यानंतर अंबादास दानवे यांनी विशेष उल्लेख म्हणून शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा विधान परिषदेत मांडला. यावेळी सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी आझाद मैदानात जमलेल्या शेतकऱ्यांना भेटीसाठी बोलावलं पाहिजे, अशी मागणी केली. या दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
अंबादास दानवे म्हणाले की, आम्ही शक्तिपीठ महामार्ग आंदोलनाला आता जाऊन भेट दिली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मार्ग होऊ देणार नाही, अशी घोषणा केली होती. त्यामुळे या महामार्गाप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी अंबदास दानवे यांनी केली. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे, तो लादायचा नाही, अशी शासनाची भूमिका आहे. मी जेव्हा कोल्हापूरला गेलो होतो तेव्हा, सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यासोबत तेथील शेतकरी कोल्हापूर विमानतळावर माझी प्रतीक्षा करत होते. शेतकरी या महामार्गाला विरोध करत असून त्यांच्या सह्याचं निवेदन त्यांनी मला दिलं होतं, अशी माहिती फडणवीस यांनी सभागृहात दिली.