विशेष प्रतिनिधी
Pune News: पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पुण्यातील संतोष जगदाळे (५४, ज्ञानदीप कॉलनी, कर्वेनगर) व कौस्तुभ गनबोटे (५६, शांतीनगर, साळवे गार्डन, गंगाधाम) यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत हजारो पुणेकरांच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.
या अंत्यविधीसाठी दोन्ही कुटुंबांच्या शोकाकुल वातावरणात पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला आदरांजली अर्पण केली. उपस्थितांमध्ये केवळ दुःख नव्हे तर पाकिस्तानविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली होती. “दहशतवाद्यांना आता सोडू नका, पाकिस्तानला चोख उत्तर द्या,” अशा संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
या अंत्यविधीचे सर्वाधिक हृदयद्रावक क्षण ठरले तेव्हा संतोष जगदाळे यांच्या मुलीने – आसवरीने – आपल्या वडिलांच्या रक्ताने माखलेले कपडे घालून अंत्यसंस्कार केले. हा प्रसंग पाहून अनेकांची डोळ्यात अश्रू अनावर झाले. पहलगाम हल्ल्याच्या भयावहतेची झलक या एका प्रसंगातूनही स्पष्ट होत होती.
दोघांचे पार्थिव गुरुवारी पहाटे विशेष विमानाने पुण्यात आणण्यात आले. लोहगाव विमानतळावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री दत्तात्रय भरणे, प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ, आमदार बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी आणि अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. नंतर त्यांच्या पार्थिवांची अंत्यदर्शनासाठी रुग्णवाहिकेद्वारे त्यांच्या घरी नेण्यात आली.
सकाळी ९ वाजता पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व खासदार मेधा कुलकर्णी यांनीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. अंत्यसंस्कारावेळी सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोषणाबाजी करत, “पाकिस्तान मुर्दाबाद”, “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्” च्या गजरात अंत्यसंस्कार पार पडले.
या हल्ल्यातील धक्कादायक प्रसंगाची माहिती देताना जगदाळे यांची पत्नी प्रगती आणि मुलगी आसवरी यांनी शरद पवारांसमोर आपले दु:ख कथन केले. “रक्ताच्या थारोळ्यात आमची माणसं पडली होती. कोणालाही न जुमानता त्यांनी थेट गोळ्या झाडल्या. कुठलाही सुरक्षा रक्षक नव्हता,” अशा शब्दांत त्यांनी त्या भीषण क्षणांची आठवण करून दिली.
या घटनेनंतर प्रगती जगदाळे यांनी आपल्या भावना व्यक्त करत, “आता मी माझ्या नवऱ्याला कुठं बघणार? अशा भ्याड हल्ल्याला आता जशास तसे उत्तर द्या,” अशी भावनिक मागणी केंद्र सरकारकडे केली. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनीही केंद्र सरकारने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे नमूद केले.
Tearful farewell to Santosh Jagdale and Kaustubh Ganbote; Wave of anger against Pakistan at funeral
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : उध्दव – राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले
- Chief Minister : तंत्रज्ञानाच्या मदतीने शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा, मुख्यमंत्र्यांचे डाॅक्टरांना आवाहन
- Supreme Court : मग संसद भवनच बंद करा.. उपराष्ट्रपतींपाठाेपाठ भाजपचे खासदार सर्वाेच्च न्यायालयावर बरसले
- West Bengal : हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागातील महिलांची राज्यपालांपुढे कैफियत