विशेष प्रतिनिधी
मुंबई : मातोश्रीवर न्याय मिळत नाही, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ऐकून घेत नाहीत हेच शिवसेनेतील उठावाचे कारण सांगितले जाते. पण त्यानंतरही उध्दव ठाकरे सुधारले नसल्याचे आज स्पष्ट झाले. तक्रार करायला गेलेल्या नाराज नेत्यावरच भडकले.
शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांनी आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत राजन साळवी यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्याबाबत उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली. त्यावर विनायक राऊतांना पक्षातून काढू का? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी राजन साळवींना केला. तुम्हाला भाजपमध्ये जायचे असेल तर जा, अशा शब्दांत साळवींना सुनावले.
बिचारे साळवी त्यांना सांगत होते की त्यांना जायचे नाही पण ते ऐकायलाच तयार नव्हते. साळवी लवकरच पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याची भावना राजन साळवी यांच्या मनात असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच ते नाराज असून भाजप किंवा शिंदे गटात जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, या सर्व अफवा असून मी कायम बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक राहणार असल्याचे साळवी यांनी 2 दिवसांपूर्वी म्हटलेही होते.
राजन साळवी यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरच्या आपल्या भावना उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केल्या. दोघांमध्ये मातोश्रीवर पाऊण तास चर्चा झाली. यावेळी राजन साळवी यांच्यासोबत तालुका प्रमुख, मुंबई आणि स्थानिक संपर्क प्रमुख उपस्थित होते. या भेटीत राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंकडे विनायक राऊतांच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचला. विधानसभेत झालेल्या पराभवाला विनायक राऊत हेच जबाबदार आहेत, असा आरोप साळवींनी केला. तसेच विनायक राऊत आणि जिल्हाप्रमुखांचे शिंदे गटाचे नेते उदय सामंत आणि किरण सामंत यांच्याशी चांगले संबंध आहेत, असा दावाही राजन साळवी यांनी केला.
राजन साळवी यांनी केलेल्या तक्रारीनंतर उद्धव ठाकरेंनी विनायक राऊतांच्या पराभवाला तुम्ही जबादार नाही का? असा उलट प्रश्न राजन साळवींना विचारला. त्यावर विनायक राऊतांना मी 21 हजारांची लीड दिली, त्यामुळे मी जबाबदार कसा? असा उलट प्रश्न उद्धव ठाकरेंना केला.
राजन साळवींच्या या प्रश्नावर उद्धव ठाकरे चांगलेच संतापल्याची माहिती आहे. तुमच्या म्हणण्यानुसार आता काय करायचे? विनायक राऊतांना पक्षातून काढू की, जिल्हा प्रमुखाला काढू? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. त्यावर राजन साळवी यांनी तो आपला निर्णय आहे, असे उत्तर दिल्याची माहिती आहे. तसेच तुम्हाला भाजपमध्ये जायचे असेल तर जा, अशा शब्दांत ठाकरे राजन साळवींवर भडकले.
Uddhav Thackeray’s impetuous justice flared up on the disgruntled leader who went to complain
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली