Cheese analogue : चीज ॲनालॉग’चा उल्लेख बंधनकारक; राज्यभर विशेष तपासणी मोहीम

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Cheese analogue हॉटेल्स, उपाहारगृहे, भोजन व्यवस्था पुरवठादार तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांना विक्री पावती, मेन्यू कार्ड आणि दर फलकांवर ‘चीज ॲनालॉग’चा स्पष्ट उल्लेख करणे आता बंधनकारक करण्यात आले असून अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व विभागीय अन्न सहआयुक्तांना दिले आहेत.Cheese analogue

महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेची दखल केंद्र सरकारच्या Food Safety and Standards Authority of India ने घेतली असून शुद्ध पनीरसाठी राज्याने घेतलेली भूमिका देशासाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे मानले जात आहे. १ मे २०२६ पासून या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.Cheese analogue

राज्यव्यापी तपासणी मोहिमेच्या पहिल्या दहा दिवसांत १ हजार ४९६ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यासाठी २७५ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तपासणीदरम्यान ८७१ आस्थापनांमध्ये नियमांनुसार ‘चीज ॲनालॉग’चा स्पष्ट उल्लेख आढळून आला, तर आवश्यक माहिती न दिल्याने ३२० आस्थापनांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.



 

प्रशासनाच्या माहितीनुसार, मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागांत व्यापक तपासण्या करण्यात आल्या. ग्राहकांची दिशाभूल होऊ नये आणि त्यांना योग्य माहिती मिळावी यासाठी विक्री पावत्या, भोजन सूची तसेच इलेक्ट्रॉनिक फलकांवर उत्पादनाचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार ‘पनीर’ हा पदार्थ केवळ दुधापासून तयार केलेला असतो. मात्र ‘चीज ॲनालॉग’ किंवा ‘दुग्ध पर्यायी पदार्थ’ हे खाद्यतेल, स्टार्च आणि इतर मिश्रक द्रव्यांच्या सहाय्याने तयार केले जातात. हे पदार्थ पनीरसारखे दिसत असले तरी ते पारंपरिक पनीर नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील अनेक हॉटेल्स, उपाहारगृहे आणि फास्ट फूड केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘चीज ॲनालॉग’चा वापर होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्राहकांना ‘शाही पनीर’सारख्या पदार्थांमध्ये प्रत्यक्ष पनीर वापरले आहे की पर्यायी पदार्थ, याची स्पष्ट माहिती मिळणार आहे.

दुग्धभेसळ रोखण्यासाठी प्रशासनाने आधुनिक दूध परीक्षण यंत्रे, त्वरित चाचणी संच आणि दूध विश्लेषण प्रणाली उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील फिरत्या अन्न परीक्षण प्रयोगशाळांची संख्या वाढविण्याची कार्यवाही सुरू असून जनजागृती, प्रशिक्षण आणि नियमित तपासण्यांवरही भर दिला जात आहे.

ग्राहकांनी कोणतेही उत्पादन खरेदी करताना त्यावरील माहिती काळजीपूर्वक वाचावी तसेच ‘दुग्ध पर्यायी पदार्थ’ असा उल्लेख आहे का, याची खात्री करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ग्राहकांची दिशाभूल झाल्यास १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

‘Cheese analogue’ disclosure now mandatory; statewide inspection drive launched

महत्वाच्या बातम्या